पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे 17 कोटी रुपये गेले कुठे? अभिजित पाटील यांनी केली चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील शेतकऱ्य़ांचा राजवाडा म्हणून ओळख असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. चालू हंगाम सुरू होणार की नाही, ऊस उत्पादकांची देणी मिळणार की नाही. यावर तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात असताना धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल कारखाना व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ लावल्यास 17 कोटी 13 लाख रुपये शिल्लक राहतात. हे पैसे गेले कुठे, असा सवाल करत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गुरुवारी (दि. 30) होणाऱ्य़ा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विठ्ठल साखर कारखान्यावर भगीरथ भालके यांची सत्ता असून, तेच अध्यक्ष आहेत.

अभिजित पाटील म्हणाले, श्री विठ्ठल कारखान्याने 2020-21 च्या गळीत हंगामात 3 लाख 3 हजार 547 टन उसाचे गाळप करून 2 लाख 67 हजार 225 पोती साखर तयार केली. या साखरेची किंमत 82 कोटी 83 लाख 97 हजार 500 रुपये आहे. एफआरपीनुसार 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये शेतकऱ्य़ांची देणी होतात. मात्र, यातील 30 ते 35 कोटी एफआरपी थकली आहे. तर मोलॅसिसपासून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपये उत्पन्न मिळाले. तर, वीजनिर्मितीतून 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपये मिळाले. असे एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपये एकूण उत्पन्न मिळाले. ऊस बिल, तोडणी वाहतूक, कामगार पगार असे एकूण 93 कोटी 95 लाख 76 हजार 900 रुपये देणी लागत आहेत. तरी कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम कुठे गेली?, असा सवाल अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे.

2018, 2019-20 आणि 2020-21 या तीन वर्षांत कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा विनियोग कुठे केला आहे, याची माहिती त्यांनी विचारली आहे. तसेच 2019-20 आणि 2020-21 या अहवालानुसार कोणकोणते संचालक, त्याचे नातेवाईक यांच्याकडे किती कर्ज आहे याची माहिती द्यावी. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्य़ा ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आपल्याला हे मुद्दे मांडताना अडचणी निर्माण केल्या जातील, बोलू दिले जाणार नाही, अशी शंका अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करणार

वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्यास मला सभेत सहभागी होण्यासाठी सभेची लिंक व पासवर्ड मिळावा. मला विषय मांडताना कोणताही अडथळा येऊ देऊ नये. काही तांत्रिक कारण सांगून माझा आवाज बंद करून माझा बोलण्याचा हक्क हिरावून घेऊ नये. सभासद म्हणून बोलताना अडथळा आणू नये. अडथळा आणला गेला तर संचालक मंडळाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येईल, असा इशारा अभिजित पाटील यांनी दिला आहे.