पंढरपुरात कुंभारघाटाची भिंत कोसळली; सहा ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील कुंभारघाटाची भिंत कोसळून सहाजण ठार झाले. शेकडो वर्षांचे जुने घाट आजही डौलात उभे असताना तीन वर्षांपूर्वी बांधलेला हा नवीन घाट पावसामुळे कोसळला. 51 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या घाटाचे काम निकृष्ट होत असल्याची बाब दै. ‘सामना’ने लक्षात आणून दिली होती. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या घटनेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे.

गोपाळ अभंगराव, राधाबाई अभंगराव, मंगेश अभंगराव, पिल्लू जगताप (वय 12) यांच्यासह अन्य दोन महिला अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी घाटावरील काही लोक या घाटाच्या भिंतीला टेकून उभे होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक भली मोठी दगडी भिंत बाजूच्या जुन्या घाटावर कोसळली. सायंकाळपर्यंत सहाजणांचे मृतदेह ढिगाऱयाखालून काढण्यात आले.

आंध्र, तेलंगणात पावसाचा धुमाकूळ; 11 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश आणि तेलंगणात या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेलंगणातील अनेक भागांमध्ये पावसाळामुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 9 जणांचा मृत्यू बदलागुडामधील मोहम्मदिया हिल्स येथील भिंत कोसळल्याने झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 बालकांचा समावेश आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहे.

अक्कलकोटचा दुर्बीण बुरुज ढासळला

अति पावसामुळे अक्कलकोट संस्थानच्या जुना राजवाडय़ाच्या दुर्बीण बुरुज ढासळल्याची घटना बुधवारी घडली. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती. त्यावेळी हा वाडा बांधण्यात आला होता. दरम्यान, राजवाडय़ाच्या देखभालीसाठी नेमलेल्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या वाडय़ाची पडझड होत असल्याचे मत अक्कलकोट संस्थानचे मानकरी बाबासाहेब निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

सोलापूरही जलमय, घरांची पडझड

सोलापूर शहर व जिल्हय़ाला परतीच्या पावसाने झोडपले असून, अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील नागरी वस्त्या व रस्ते जलमय झाले असून, एस.टी. बससेवा बंद करण्यात आली आहे.

सांगलीतील अनेक रस्ते पाण्याखाली

परतीच्या मुसळधार पावसाने बुधवारी संपूर्ण सांगली जिह्याला झोडपून काढले. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार बुधवारी दिवसभरही चालूच होती. त्यामुळे सांगली-मिरज शहरांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर जिह्याच्या ग्रामीण भागातील ओढे, नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे जवळपास 2 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. कायम दुष्काळी असणाऱया कवठेमहांकाळ जत, खानापूर, आटपाडी या तालुक्यांत यावेळी सर्वाधिक पाऊस पडला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.