
संजीवनी धुरी-जाधव
अवघ्या महाराष्ट्राचे परब्रह्म सध्या सहलीला गेले आहेत… विश्रांतीसाठी… गुलाबी थंडी… आवडता मार्गशीर्ष महिना… सध्या देव विठ्ठलपंतांचा चंद्रभागेत विष्णुपदी मुक्काम आहे.
भगवान पांडुरंग सध्या विश्रांती घेताहेत… त्यांनी त्यांचे निवासस्थान बदलले आहे… सध्या ते चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिरात वास्तव्याला आहेत… वाचून थक्क झालात ना?? पण हे खरंय… भगवान पांडुरंग सध्या चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिरात त्यांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. मंदिरातील सर्व नित्योपचार मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदावर केले जातात… त्यामुळे भक्तमंडळी त्यांना भेटण्यासाठी विष्णुपदावर गर्दी करताहेत.
पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद हे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात देव विष्णुपदावर राहायला येतात असे मानले जाते. कार्तिक वद्य वारीला आळंदीवरून परत आल्यावर देव मंदिरात परत न येता विष्णुपदावर मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर रहायला जातात अशी समजूत आहे. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीकालापासून त्याला एक वेगळे वळण लागले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर देव दुःखी झाले. ज्ञानोबा माउलीनी संजीवन समाधी घेतली तेव्हा व्यथित होऊन भगवान पांडुरंग मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला वास्तव्यासाठी आले. त्यामुळे आजही मार्गशीर्ष महिन्यात देवाचे वास्तव्य विष्णुपदाला असते असे मानले जाते. नदीच्या अवतीभवती जे दगड आहेत त्या दगडांवर देवांच्या पायांचे ठसे असल्याचे निंबाडकर साम्राज्याचे वैष्णव साधू मोहनदास गुरुबनबिहारीदास महाराज सांगतात.
पुढे ते म्हणाले, चंद्रभागेच्या पात्रात जे तीर्थ आहे त्या तीर्थातलं सगळ्यात मोठं तीर्थ विष्णुपद आहे. विष्णुपद आपल्याकडे दोनच ठिकाणी आहे. एक बिहारमध्ये गया आणि दुसरं पंढरपुरात… या विष्णुपदावर समस्त पितृलोकांचा उद्धार होतो. त्यानंतर दानधर्म करण्यासाठी ही प्रमुख जागा आहे. आपला धर्म हा श्रद्धेवर आहे, त्याला विज्ञानाचे कितीही पुरावे मागितले तर आम्ही ते देऊ शकत नसल्याचेही ते मोहनदास महाराज सांगतात. त्यांचे याबाबत म्हणणे आहे की सद्पुरुष मागे पुरावे ठेवत नाही. सद्पुरुषांना काम करुन पुढे जायचे असते. तसेच पूर्वीच्या काळात मार्गशीर्ष महिना म्हणजे थंडीचा महिना. या महिन्यात कडाक्याची थंडी असते. भगवद्गगीतेच्या नवव्या अध्यायात सांगितले आहे की ‘मासोत्तम मासे मार्गशीर्ष मासे’. मार्गशीर्ष मासाचं स्वरुपच परमात्मा श्रीपृष्ण आहे. श्रीकृष्ण हाच पांडुरंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतल्यानंतर भगवान पांडुरंग एक महिना विश्रांतीसाठी विष्णुपदावर जाऊन बसतात. त्यामुळे त्या कालावधीत देवाला भेटायला भक्तगण विष्णुपदावर जातात. थंडीच्या दिवसात त्यांचा व्यायामही होतो, असे मोहनदास महाराज सांगतात.
वेळ अमावास्येला पंढरपुरात येतात
एक महिन्यासाठी पांडुरंग मंत्ररुपात विष्णुपद मंदिरात विश्रांतीसाठी असतात. प्रतिपदा ते अमावास्या या काळात तिथे राहून वेळ अमावास्येच्या दिवशी देव रथात बसून वाजत गाजत पंढरपुरात येतात. देवाच्या रथाला शेतात आलेली धान्यांची रोपं बांधली जातात. फळ, फुलांनी देवाचा रथ सजवला जातो आणि आनंदोत्सवात देव पुन्हा मंदिरात येत असल्याचे महाराज सांगतात.
असंख्य पुंडलिकांसाठी…
विष्णुपदाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. तिथे पायी आणि होडीतूनही जाता येते. येथून जाताना नदीच्या कडेला नारद, व्यास, वाल्मिकी, पुंडलीक या सगळ्या संतांचं त्या वाटेवर दर्शन होतं. कारण पांडुरंगाचा जो अवतार आहे, तो केवळ पुंडलिक म्हणजे त्यांच्या भक्तासाठी आहे. पुंडलिकाने असाच वर मागितला की माझ्यासारखे असंख्य पुंडलिक या तीर्थामध्ये तुझे दर्शन घेतील आणि माझ्याप्रमाणे पावन होतील. तोपर्यंत देवा मी बस म्हणून तुला सांगत नाही. म्हणून देवाला विटेवरती उभा केला आहे.
ज्याला घडली नाही काशी… त्याने जावे विष्णुपदासी
मोहनदास महाराज पुढे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात लोकांचे आरोग्य अबाधित राहावे, लोक खेळकर वृत्तीचे व्हावे, सर्व लोक एकोप्याने राहावे, लहानथोरपणाच्या मितू पणाची बोळवण व्हावी या शुद्ध हेतूसाठी सर्वांनी एकत्र येऊन एकत्र जेवण करायचे. माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय जेवण आहे. आपण रोज एकत्र जेवत नाही. पण मार्गशीर्ष महिन्यात या सगळ्या निमित्ताने भक्त पंढरपुरात येतात. ‘गया राम नाम काशी, अवघे विठ्ठलाच्या चरणापाशी, ज्याला घडली नाही काशी… त्याने जावे विष्णुपदासी.’ पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं नव्हती, कोणी सोबत नव्हते. अशा अभागी जीवांना साधुसंतांनी सांगितले की, तुम्ही पंढरपुरात विष्णुपदाला जा. तिथे स्थान केले, तिथे बसून जेवण केलं, नामस्मरण केलेत, तिथे बसून खेळ खेळलात, मनाला आनंद मिळाला की तुम्हाला काशी गेल्याचं पुण्य मिळतं.
























































