शास्त्रीय गायन – वादनाची पर्वणी, पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दी सोहळा

हिंदुस्थानी अभिजात संगीतातील अग्रगण्य गायक, रचनाकार आणि श्रेष्ठ गुरू पंडित सी. आर. व्यास ऊर्फ ‘गुनिजान’ यांचा जन्मशताब्दी सोहळा रविवार, 10 डिसेंबर रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत होणार आहे.

पंडित सी. आर. व्यास यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ललित कला निधी या संस्थेतर्फे हा कार्यक्रम ग्रेस फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीने सादर केला जाणार आहे. जागतिक कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे एकल तबला वादन हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहे.

प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन होईल. तसेच लोकप्रिय गायिका बेगम परवीन सुल्ताना यांचेही गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळेल. तसेच संतूरवादक पंडित सतीश व्यास आणि पंडित सुहास व्यास हेदेखील आपली कला सादर करून वडिलांना आदरांजली अर्पण करणार आहेत.

आरजेंसोबत रंगणार सुरांची मैफल

‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या कार्यक्रमात गाण्यांबरोबरच नावीन्यपूर्ण संकल्पनांवरील भागदेखील पहायला मिळत आहेत. या आठवडय़ात ‘आरजे स्पेशल’ कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये आरजे श्रुती, ज्ञानेश्वरी, सोनाली आणि आरजे दिलीप सुरांच्या महामंचाची मैफल सजवणार आहेत.

या धमाल एपिसोडमध्ये चार आरजे प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट घेऊन आले असून ‘सूर नवा ध्यास नवा’चे स्पर्धक तेच गाणे सादर करतील. हा कार्यक्रम रविवारी रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.