माझा आवडता बाप्पा : माझे बाबा

332

>> पं. सुहास व्यास, ज्येष्ठ गायक

  • आपलं आवडतं दैवत? : संगीताच्या दृष्टिकोनातून माझे वडील पं. सी. आर. व्यास हेच माझं दैवत. कारण, संत घराण्यात जन्म झाल्यामुळे बाबांवर संत शिकवणीचा प्रभाव होता. संगीताच्या प्रांतात राहूनही अतिशय सरळमार्गी आणि कोणाचंही वाईट होऊ न देण्याची इच्छा आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण असायचं.
  • त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? : मला त्यांचा सहवास वयाची 55 वर्षे मिळाला. गाणं शिकण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. ते गाण्यासाठी जगले.  त्यांनी खूप कष्ट खूप केले. तुमचं तुम्ही करत राहा, यश-अपयशाची अपेक्षा करू नका, हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. त्यांनी केलेले कौतुक मला नेहमी त्यांच्या डोळ्यात दिसायचं.
  • संकटात ते तुम्हाला कशी मदत करायचे, असं वाटतं? : ते म्हणायचे की, आपलं आयुष्य आहे तसं आपण जगायचं असतं. अडचणी येतच राहणार. मानसिक आणि संगीतदृष्टय़ा नेहमीच ते आमच्या मागे उभे राहिले. गाण्याकरिता प्रत्येक कलाकाराचा प्रवास असतो त्याचा अनुभव त्यांनी आम्हाला घ्यायला लावला.
  • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? : कला भक्ती असेल तरच येईल, नाहीतर येणारच नाही. कलेपुढे कलाकाराला शरण जावं लागतं. भक्ती कलाकारात असलीच पाहिजे. या दोन्हीमध्ये वर्गीकरण होतच नाही.
  • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्यांची कशी मदत झाली    ? : रियाज केला तरच आवाजाची घडण होते. त्यांनी त्याचे मार्ग सांगितले. आवाजात गोडवा कसा आणायचा हे सांगितलं. मला स्वतःला गाण्याची किती आवड आहे हे जोखलं. त्यानंतरच त्यांनी मला गाणं शिकवलं. गाण्याकडे फक्त कलेच्या माध्यमातून बघायचं. रियाज सातत्याने चालू राहिला पाहिजे.
  • त्यांच्यावर रागावता का? : कधी कधी असं होतं की, आपण लहान असताना आपलं म्हणणं त्यांनी ऐकावं असं वाटायचं. मुख्य म्हणजे रागवण्यापेक्षा कधी वाटायचं की, ते आपल्या शिष्यांना चांगलं शिकवतात. पण त्या वेळेस असं उगाच वाटायचं, आता असं वाटत नाही. कारण गाण्याचे संस्कार त्यांनीच दिले आम्हाला. गाण्यासाठी संस्कार लागतात. गाणं हे संस्कारांनी येतं. कलेला पवित्रतेची जाणीव व्हावी लागते.
  • ते तुमचे लाड कसे पुरवायचे ? : ते सतत त्यांच्या रियाजातच व्यस्त असायचे. पण त्यांनी जास्त लाड आणि कौतुक नाही केलं. कारण अति कौतुकानेही माणूस वाया जातो.
  • त्यांच्यापाशी काय मागता? : पुन्हा आम्हाला त्यांच्याच पोटी जन्म यावा, हेच मागतो.
  • नियमित उपासना कशी करता? : संगीताची उपासना सतत सुरूच असते. नेहमी गायलाच बसायला हवं असं नाही. संगीताशी संबंधित वाचणं, शिकवणं हेही उपासनेअंतर्गतच येतं.
आपली प्रतिक्रिया द्या