शिवमंदिरांच्या राज्यात – पन्नगेश्वराचे प्रतिष्ठान

>>नीती मेहेंदळे

लातूर शहरातलं आजच्या बीड जिह्याच्या सीमेला खेटून असलेलं पानगाव. चालुक्य आणि काकतीय राजवटींच्या वास्तव्याचा प्रभाव पानगाववर होता. ज्याच्या खुणा आजही आपल्याला ठळक दिसून येतात.

या गावाचं पन्नगनगरी किंवा पन्नगपूर असं प्राचीन नाव असावं. याचा काही प्रमाणात पुरातत्त्वीय पुरावा आज तिथे उपलब्धही आहे. पन्नगेश्वराचं प्राचीन शिवालय ही पानगावची खरी ओळख. पन्नगनगरीचा पन्नगेश्वर हा गावाचा अधिष्ठाता देव. त्याचं लहानसं मंदिर स्थापत्य इतिहासाच्या खुणा जपत आहे. दुसरं खंडोबा मंदिर. या मंदिरांची आधुनिक रंगरंगोटी, मुलामे जरी केले तरी या दोन्ही देवळांमध्ये इतस्तत: मांडून ठेवलेले शिल्पावशेष पाहता त्या या काळातल्या नाहीत हे त्वरित समजते.

गावातलं प्रमुख आकर्षण म्हणजे विठ्ठल मंदिर. गाभाऱयातली शिवपिंड आणि द्वारशाखेवरचे शिव द्वारपाल हे मुळात शिवमंदिर असावं हा कयास बळकट करतात. हे बऱयाच अर्थी महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. या मंदिराच्या स्थापत्यावर चालुक्य, होयसळ तसेच काकतीय स्थापत्याचा प्रभाव आहे. मंदिराची रचना मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी असून ते चार फूट उंच पीठावर उभं आहे. हे उंच पीठ व त्यावर असलेले आडवे समांतर पट्ट, वरचे कोरीव थर हे होयसळ मंदिर स्थापत्याचं वैशिष्टय़ या मंदिरात दिसून येतं.

मुखमंडपासमोर मोठा व बंदिस्त नंदी मंडप आहे. मंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. मधोमध रंगशिळा आहे. मुखमंडपाच्या प्रवेशालाच चार स्तंभ आहेत. मंडपाला उत्तर व दक्षिण बाजूंना अर्धमंडप आहेत. त्यांचे खांब कक्षासनावर उभे आहेत. या खांबांवर कर्णिकांवर अप्रतिम अशी देवांगनांची शिल्पं कोरलेली आढळतात. अशा प्रकारे कर्णिकांवर शिल्पं कोरलेलं हे मराठवाडय़ातलं एकमेव मंदिर असावं!

मंदिराच्या बाह्यांगावर शिव, विष्णू, ब्रह्मा यांच्या मूर्ती देवकोष्ठांमध्ये दिसतात. योगविष्णू, आसनस्थ वराह या वैष्णव परंपरा सांगणाऱ्या व अनेक शिवप्रतिमा शैव संप्रदाय मांडणाऱ्या असाही एक मिलाफ आढळतो. बाह्य भिंतींवर अनेक शिल्प थर दिसतात. सर्वात खाली गजधर, मग पुष्पपट्ट, भौमितिक आकृतींचा पट्ट, कीर्तिमुख पट्ट, वर वादक-नर्तक पट्ट आढळतात. यातही शिल्पांमध्ये लय जाणवते. मंदिराच्या मंडपाच्या भिंती जालयुक्त वातायन (खिडक्या) असलेल्या दिसतात. हे पूर्ण विकसित स्थापत्य शैलीचे नसून प्राथमिक स्वरूपाचे दिसते.

पानगावच्या मंदिरांमध्ये शिल्पकलेत एकूणच एक प्रकारची गतिमानता आढळते. ते या मंदिराचं अजून एक वैशिष्टय़. एक नर्तिका आहे, तिच्या हावभावांमध्ये एक लय स्पष्ट जाणवते. शालभंजिका, दर्पणा, शुकसारिका, रती, बांसरीधारिणी इ. अनेक सुरसुंदऱया या कर्णिका व मंडोवरावर कोरलेल्या दिसतात. चालुक्यकालीन शिल्पांप्रमाणे इथली शिल्पं नाजूक चणीची दिसतात. सडपातळ बांध्याची चिरतरुण वाटणारी शिल्पं लांबसडक पायांची ठेवण, नाजूक कटीप्रदेश व पुष्ट पृष्ठभाग अशी दिसतात. समृद्ध द्वारशाखा हे अजून एक चालुक्य स्थापत्यविशेष. तसेच या मंदिराच्या छतावर जेव्हा अष्टदिक्पाल कोरलेले दिसतात ते उत्तर चालुक्यकालीन शैलीचे वैशिष्टय़ समजले जाते. कीर्तिमुख छतांवर कोरलेले असणे हेही एक उत्तर चालुक्यकालीन शैलीचं वैशिष्टय़ समजलं जातं.

वरंगळजवळच्या धणापूरच्या मंदिरांप्रमाणे या कर्णिकांवरच्या शिल्पांची रचना दिसते. धणापूरची मंदिरं ही काकतीय शिल्पस्थापत्याचा उत्तम नमुना समजली जातात. अशा प्रकारे दोन स्थापत्य शैलींचा अपूर्व संगम असलेलं हे महत्त्वाचं मंदिर ठरतं. भौगोलिकदृष्टय़ासुद्धा हे गाव दोन प्राचीन राजवटींच्या सीमेवरच आहे. म्हणून दोन्ही परंपराचा मिलाफ त्यात आढळतो. याशिवाय कुंड महादेव हे अजून एक समकालीन मंदिर पानगावमध्ये सापडतं. तिथेही जुन्या दुर्मीळ मूर्ती रचलेल्या दिसतात. गावात एक पुरातन खणाची विहीरही आहे. पानगाव आणि धर्मापुरी ही काही किलोमीटरच्या अंतरावरची गावं, पण आपापली स्वतंत्र संस्कृती सांभाळून असलेली. सीमारेषेवर भाषा जशी मिश्र असते तशी शिल्पकलाही मिश्र होत जाते. पानगाव शिल्पकलेचं वारसास्थळ म्हणून सिद्ध झालं असलं तरी पुरातत्त्व खात्याकडून अधिक संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.
[email protected]