ऐतिहासिक पन्हाळेकाजी लेणींकडे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पन्हाळेकाजी येथील ऐतिहासिक लेणींचा वारसा जतन करण्याबरोबरच तेथील परिसराचे सुशोभिकरण करण्यास केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाला सपशेल अपयश आल्याने पन्हाळेकाजीतील लेणी आणि तेथील परिसराचा विकासाचे घोंगडे वर्षोनुवर्ष तसेच भिजतच पडलेले आहे. त्याचा थेट परिणाम हा पर्यटन व्यवसायावर तर होत आहेच, शिवाय लेणी पाहण्यासाठी येथे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांच्या गैरसोयीवर होत आहे.

दापोली तालुक्यात अखंडपणे बारमाही पाण्याने पात्र भरून वाहणाऱ्या कोटजाई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरामध्ये एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात. याच त्या पन्हाळेकाजीच्या लेणी होत. या लेण्यांसमोरूनच इंग्रजी एस आकाराचे नागमोडी वळणाचे कोटजाई नदीचे पात्र वाहत असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी याच्यामुळे हा परिसर अत्यंत रम्य असा दिसतो. अशा या रमणीय ठिकाणी असलेल्या यातील 28 गुहा उत्तराभिमुख असून 29 वे लेणे थोडे पुढे असलेल्या मठवली येथे असून ते गौरलेणे या नावाने ओळखले जाते. हीनयान बौद्ध पंथ, तांत्रिक वज्रयान पंथ आणि नाथ पंथातील प्रतिमांबरोबरच गणपती, लक्ष्मी, सरस्वती शिवलिंग इत्यादी देवतांच्या मूर्तीही आढळतात हे येथील वैशिष्ट्या आहे. हा लेणीसमूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून झाली त्यावेळी हीनयान बौद्ध पंथ अस्तित्वात होता. त्यापुढील काळात म्हणजे सुमारे 8व्या ते 11व्या शतकापर्यंत खोदल्या गेलेल्या लेण्यात तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व होते याचा पुरावा सापडतो. याच काळात काही मूळच्या हीनयान लेण्यांत गुप्त तांत्रिक पूजाविधीसाठी उपयुक्त असे फेरफार केले गेले. तसेच काही नवीन तांत्रिक देवतांची स्थापना करण्यात आली. 11व्या शतकानंतर शिलाहार राजा अपरादित्य (इ. स. 1127 ते 1148) याने कदम्बांकडून या परिसरातील राज्य मिळवले व आपला पुत्र विक्रमादित्य याला दक्षिण कोकण प्रांताचा अधिपती बनविले. येथील डोंगरावर प्रणालक दुर्ग नावाचा किल्ला होता. या ठिकाणी विक्रमादित्याची राजधानी होती त्याचे अवशेष, खुणा आजही दिसतात.

अशी ही प्राचीन लेणी आता केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली असून तेथे एक रक्षकही नेमलेला आहे. तथापि लेण्यांचा इतिहास, माहिती सांगणारे कोणतेही साधन तेथे उपलब्ध नाही. या लेणी समूहातील 4, 5, 6, 7, 8, 9 क्रमांकाच्या गुहा मिळून जो गट तयार होतो तो सर्वात जुना म्हणजे हीनयान बौद्ध पंथीय लेणीसमूह होय. त्याच्या पूर्वेस 1,2,3 व पश्चिमेस 10, 11, 12, 13 हे वज्रयान पंथीय तर 14 व्या लेण्यात नाथपंथीय शिल्प भिंतीवर नाथसिद्धांची शिल्पे कोरली आहेत. 15 क्रमांकाचे लेणे मूळ वज्रयान व नंतर गाणपत्यपूजन यासाठी वापरले असावे असे वाटते. येथे सुमारे 5फूट उंचीचे गणपतीचे शिल्प दगडात कोरलेले आहे. अक्षोभ्याची, ध्यानस्थ बुद्ध अशा प्रतिमा अनेक लेण्यांमध्ये आहेत. पुढे शिलाहार काळात 19, 20, 21, 22, 23 ही लेणी निर्माण झाली. यामध्ये शिवलिंग, छतावर कमळाचे अलंकरण, बाजूच्या भिंतीवर रामायण, महाभारत, कृष्णलीला इत्यादी प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत. 29 व्या लेण्यात शिवलिंग, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, गंगा यमुना यांची शिल्पे आहेत. याशिवाय इतर लेण्यांमध्ये विशेष कोरीव काम आढळत नाही. अतिशय शांत रमणीय असे हे प्राचीन स्थान आपल्या गत हजार वर्षांच्या कला संस्कृतीच्या खुणांनी साद घालत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ईतिहासकांचा आणि अभ्यासकांचा येण्याचा सतत वाढता ओघ असतो. असे असले तरी याठिकाणी अजूनही धड रस्त्याची सोय नाही.

असलेल्या खाच खळग्यातील रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. प्रत्येक लेण्यांठिकाणी माहीती दर्शविणारे माहीतीपटाचे फलकही उभारण्यात आलेले नाहीत. तसेच ही लेणी पाहण्यासाठी किमान दोन अडीच तासाचा कालावधी लागत असल्याने या ठिकाणी एखादयाला लघु शंका करावयाची झाल्यास येथे स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे तासनतास माहीती साठी घालवावे लागत असल्याने येथे खानपानाची सुविधा देणारे एखादे उपहारगृहसुध्दा उपलब्ध नाही. पर्यटकांना, इतिहासकांना अथवा अभ्यासकांना हे ठिकाण आवडत असले तरी या ठिकाणी नेट कनेक्टीव्हीटीची कमतरता असल्याने येथे आलेल्या प्रत्येकालाच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लेणी परिसराच्या सुधारणेसह कोटजाई नदीपात्रात जल पर्यटनासारखी सुविधा उपलब्ध करून केंद्र शासनाने हा परिसर विकसित केला तर येथील पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल त्यामुळे पन्हाळेकाजी ऐतिहासिक लेण्यांचा वारसा जतन करणा-याबरोबरच या परिसराचा केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून विकास करावयाला हवा येथे पायाभुत अत्यावश्यक सोयी सुविधांचे जाळे निर्णाण करायला हवे मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा ऐकीकडे अमृतमहोत्सव साजरा होत असताना सत्ताधारी मेकिंग इंडीया, डिजिटल इंडिया हे स्वप्न दाखत असताना अशी ठिकाणे दुर्लक्षीत ठेवून केंद्र शासन नेमके काय साधत आहे. मग हाच का तो विकास आणि देशाची प्रगती असे नाही म्हटले सत्ताधा-यांच्याबाबतीत तरी हे ठिकाण पाहील्यावर कोणालाही वाटल्याशिवाय राहवत नाही.