
वंचितांचा वाली बनण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते, तेच स्वप्न आपलेही आहे. पण इथे आता राम नाही, असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी बघू. शक्तीच दाखवायची आणि दबावच आणायचा तर त्यासाठी जागा पुरणार नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी वेळ आल्यास कठोर निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा सूचक इशारा भाजप नेतृत्वाला दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने मुंडेसमर्थकांत तीव्र असंतोष आहे. याचा निषेध म्हणून नाराज मुंडेसमर्थक भाजप पदाधिकाऱयांनी एकापाठोपाठ एक राजीनामे देण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत गेलेल्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून परतताच नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
जे मुळात सुंदर असतं त्याला अलंकाराची गरज नसते आणि ज्याला अलंकाराची गरज लागते ते मुळात सौंदर्य नसतं. आज माझ्याकडे पदाचे अलंकार नसतील, पण कार्यकर्त्यांच्या शक्तीचे सौंदर्य आहे. ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे. माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात, असे सांगत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
समर्थकांचे राजीनामे पंकजा यांनी फेटाळले
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या मुंडेसमर्थकांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले होते. पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत धडकले. या सर्व समर्थकांचे राजीनामे पंकजा यांनी फेटाळून लावले. पद मिळवणे हे आपले ध्येय नाही. आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद हा आपल्या राजकारणाचा पाया नाही. तर वंचितांच्या बाजूने प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मी संपलेले नाही
मी सगळं दुःख भोगलंय. पण मी संपलेले नाही, संपले असते तर संपवण्याचे प्रयत्नही संपले असते. मी कुणाला भीत नाही. माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार आहेत. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करते जोवर शक्य आहे. आपण कष्टाने बनवलेले घर का सोडायचे. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्या दिवशी बघू, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोदी, शहा माझे नेते!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा हे माझे नेते आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. मला माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी कधी अपमानित केले नाही. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल संघटनेच्या कामासाठी दिल्लीत गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांची नाराजी दूर कराल, असा विश्वास पक्षश्रेष्ठीनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो, असे सांगत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले.



























































