पनवेल-नांदेड एक्प्रेसमधून तीन लाखांचा ऐवज लुटला, माढ्यातील ढवळस रेल्वेस्थानकाच्या आऊटर सिग्नलजवळील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल-नांदेड (गाडी नं. 17613) या रेल्वेची गती कमी झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या बोगीच्या खिडकीतून हात घालून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर साहित्य असे एकूण 2 लाख 83 हजारांचा ऐवज लुटून नेला. माढा तालुक्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नलजवळ ही घटना घडली. याबाबत कुर्डुवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिल्पा कमल मोदी (रा. पुसद, जि. यवतमाळ) व अक्षय अनंत मोरे (रा. वाकड, पुणे) यांनी फिर्यादी दिल्या आहेत. शिल्पा मोदी या पनवेल-नांदेड गाडीने बोगी नंबर एस-2 या डब्यातून प्रवास करीत होत्या. खिडकीकडे डोके करून झोपल्या असताना गाडीची गती कमी झाल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 लाख 50 हजारांची सोन्याची चेन पळवून नेली. याच गाडीतील अक्षय मोरे हे चिंचवड ते पूर्णा बोगी नं. एस-10 मधून प्रवास करीत होते. त्यांच्या बॅगेतून इअरबड, वायफाय डिव्हाइस 2000, ऍपल इअरबड, जेनेक्स कंपनीचा चष्मा असा एकूण 33 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला.

दोघांचा मिळून एकूण 2 लाख 83 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पुणेचे अपर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, लोहमार्गचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चौगुले, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे प्रभारी पालवी काळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पुण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंतरकर, हवालदार कदम, पोलीस नाईक कांबळे व पी. एन. भोसले, कुर्डुवाडी तपास शाखेचे हवालदार संजय सरोदे व पोलीस नाईक गणेश जगताप यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली.

यापूर्वीही कुर्डुवाडी बाहेरील सिग्नलजवळ चोरीच्या घटना घडल्या आहेत. परिसरात चोऱ्या वाढत असल्यामुळे प्रवाशांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात रेल्वेतील चोरीच्या घटना वाढत असतात. यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्याची गरज आहे.