
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणखी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील गावांनी आपापल्या गावच्या सीमा कडकपणे बंद कराव्यात आणि गावात बाहेर गावाहून येणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये. तसेच असे आढळल्यास व माहिती लपवल्यास प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा सेलूचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी बैठकीत दिला. कुठल्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यात कोरोनाला शिरकाव करू द्यायचा नाही असा ठाम निर्धार सर्व अधिकारी व जनतेने केला आहे.
सेलूत नूतन महाविद्यालयात रविवारी जालना व मंठा सीमेवरील एकूण 13 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील व सरपंचाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,तहसीलदार बालाजी शेवाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे,पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी या 13 गावातील तलाठी,ग्रामसेवक यांनी आजपासून गावातच मुक्कामी थांबण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर तर दक्षता समिती आहेच परंतु या सीमेलगतच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र समिती तयार करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी सांगितले. यावेळी गावात जर नवीन व्यक्ती आला आणि माहिती लपवल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत. तसेच गावात जर कुणाला अन्नधान्य अथवा इतर अडचण असल्यास गाव पातळीवरच दानशूर लोकांच्या मदतीने समस्या सोडवाव्यात असेही सांगण्यात आले.





























































