
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळीत ( सिरसाळा ) पंचतारांकित एमआयडीसी उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे. परळीत एमआयडीसी उभारणीसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करावी असे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी यासंबंधी आग्रही मागणी केली होती.
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात परळी मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते, त्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी हा आदेश दिल्याचे समजते.
परळी शहराजवळील सिरसाळा भागात एमआयडीसी साठी जमीन राखीव आहे. विधानपरिषद सदस्य असताना धनंजय मुंडे यांनी 27 जून 2017 ला याबाबत पहिली मागणी केली होती. 8 जुलै 2017 ला शासन स्तरावर पहिली बैठक होऊन याबाबत भुनिवड समितीने जमीन पाहणी करावी असा निर्णय झाला होता. नंतर नोव्हेंबर 2017 मध्ये या भूनिवड समितीने जागेची पाहणी देखील केली होती. या एमआयडीसी साठी एकूण 101.66 हेक्टर आर क्षेत्र अधिग्रहित करण्याचे याअगोदरच जून 2018 मध्ये उच्चाधिकार समितीने निश्चित केलेले आहे.
मुंडे यांच्या मागणीनंतर शासनाने घेतलेल्या बैठकीत पुढील टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी शासकीय 96.65 हेक्टर आर जमीन तात्काळ संपादित करण्याचे आदेश देण्यात आले असून, सिरसाळा भागातील गायरान जमीन असल्यामुळे जमीन संपादनाच्या प्रक्रियेस फार वेळ लागणार नाही.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अजून बाकी आहे, त्या विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांचेही नाव अग्रस्थानी असणार आहे. असे असतानाही मंत्रीमंडळ विस्तार किंवा पद यापेक्षा आपल्या मतदारसंघात दिलेले अश्वासन पूर्ण करण्यास धनंजय मुंडे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे परळीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.





























































