
सामना प्रतिनिधी। पोखर्णी
परभणी तालुक्यातील पोखर्णी रेल्वे स्टेशन येथून जवळच असलेल्या आंबेटाकळी शेत कॅनॉलमध्ये एका ५८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंग कचरुलाल शर्मा (58)
नरसिंग परभणी येथील परसावत नगर येथे ते राहत होते. ते आचाऱ्याचे काम करत होते. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वंयपाकाच्या कामाला जातो असे म्हणून बाहेर पडले होते. पण ते परत आलेच नाही. यामुळे त्यांचा मुलगा प्रमोद आणि नातेवाईकांनी शोधा शोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आंबेटाकळी शिवाराजवळील माणिक आव्हाड यांच्या शेताजवळील कालव्यात त्यांचा पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर प्रमोदने पोलिसात फिर्याद दिली.
दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी मृतदेहाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नरसिंग यांची हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस उपाधीक्षक गील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे तपास करत आहेत.

































































