
सामना प्रतिनिधी, परभणी
पावसाळा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना परभणी शहर महानगरपालिकेने अद्यापही पावसाळा पूर्व सफाईला वेळ मिळाला नाही. त्यामुळे परभणी शहरात सर्वत्र जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबल्या असून अस्वच्छतेने कळस गाठला असल्याचे चित्र दिसून येत असून महानगरपालिकेच्या उपाययोजना केवळ कागदोपत्रिच राबविण्यात येत असल्याने कुचकामी ठरल्याची चर्चा होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सुचना देऊनही अद्यापर्यंत महानगरपालिकेने पावसाळापूर्व सफाईचे काम हाती घेतले नाही. परभणी शहरात सर्वात मोठा डिग्गीनाल्याची सफाईचे काम अद्यापही सुरु करण्यात आले नाही. आठ ते दहा दिवस हे सफाईचे काम करावे लागते. निरज हॉटेल परिसरातील या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे विविध रोगराईला निमंत्रणच मिळत आहे. या नाल्याच्या बाजुला डॉक्टर लेन आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन आलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा पूर्व सफाईमध्ये हा डिग्गीनाला सफाई केला नाही तर या नाल्याचे पाणी बाजूस असलेल्या बसस्थानकात शिरते. सखल भागात पाणी साचत असल्याने घाण पाण्यातूनच प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागते. डिग्गी नाल्याच्या बाजूस संरक्षण भिंत नसल्यामुळे घाण पाणी चक्क बसस्थानकात जाते. हा प्रकार दरवर्षी घडतो. त्यामुळे सफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील सर्वच रस्त्यांना देखील आवकाळा आली आहे. त्याचेबरोबर बाजूस असलेल्या नाल्या अनेक दिवसांपासून सफाई करण्यात न आल्याने त्या अक्षरश: तुंबल्या आहेत. पावसाळ्याचे पाणी आल्यानंतर या तुंबलेल्या नाल्या न वाहता, घाण पाणी रस्त्यावरुनच वाहत असते. शहरातील रामकृष्ण नगरात नाल्याचे पाणी तब्बल 2 महिने रस्त्यावरुन वाहत असल्याचा प्रकार घडत असतो.
महानगरपालिकेने पावसाळापूर्व सफाईचे काम न केल्यामुळे स्टेडियम परिसरातही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहे. क्रीडा संकुलाजवळील नाली साफ न केल्यामुळे घाणपाणी स्टेडियम मधील दुकानांमध्ये शिरते. महानगरपालिकने त्वरीत स्वच्छतेची मोहीम कागदोपत्री न राबविता प्रत्यक्ष काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. शहरातील कचरा कुंड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घंटागाडी ही अनियमीत येत असल्याने शहरात अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गांधी पार्क, क्रांती चौक, शिवाजी चौक, नारायण चाळ, शिवाजीनगर आदी भागामध्ये नाल्या तुंबल्याचे प्रकार हे दरवर्षी पहावयास मिळतात. महानगरपालिकेने वेळीच या नाल्याची सफाई केल्यास पाणी जाण्यास वाट उपलब्ध होईल. परंतु अद्यापही मनपा प्रशासनास जाग आली नाही. नागरिक श्रमदानातून स्वच्छतेची मोहिम राबवून तुंबलेले पाणी किमान आपल्या घरात किंवा दुकानात येऊनये, याची काळजी घेताना दिसून येत आहेत.
























































