परभणी – पूर्णा ताडकळस रोडवर विटांनी भरलेली पीकअप उलटली, एकाचा जागीच मृत्यू

ताडकळस-पूर्णा रोडवर बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास एक वीटांनी भरलेली पिकप पलटी झाल्याने त्यामधील एका मजुराचा गाडीखाली दबून जागीच मृत्यू झाला तर या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पूर्णा शहरातील भीमनगर परिसरात राहणारा मजूर मयत सुनील भगवान भगत (35) हा आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरातून काम करण्यासाठी वीटभट्टीवर गेला होता. शहरातील एका वीट भट्टी मालकाच्या भट्टी वरून भाजलेली वीट वाहन (एम.एच. 12 ऐ.आर. 6617) मध्ये भरून महिंद्रा पीकअप ताडकळस पूर्णा रोडने विटा विक्री करण्यासाठी जात होती. सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान सदर गाडीचा चालक शेख रशीद याने आपल्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगाने चालवल्याने बळीराजा कारखाना परिसरातील रस्त्यावर ती पलटी झाली. यामध्ये जीपचा केबिन मध्ये बसलेल्या मजूर सुनील भगवान भगतच्या बाजुने गाडी पलटली. यात त्याच्या अंगावर गाडी पडल्याने सुनील भगत हा गाडीखाली दबून जागीच ठार झाला.

गाडीमधील चालक शेख रशिद शेख चांद व विक्की दिलीप आहीरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेच्या घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली होती. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मयताचे मृत्यूस कारणीभूत असलेल्या पिक अप चालकांविरुद्ध मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

आपली प्रतिक्रिया द्या