पूर्णेत 35 विद्यार्थ्यांना विषबाधा; चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील पांगरा रोडवर असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत शुक्रवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर तब्बल 35 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येवढे सगळे घडूनही पूर्णेच्या तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट दिली नाही. या बाबत पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

राज्य समाज कल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व भोजन एकाच ठिकाणी मिळावे यासाठी निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्णा शहरातील पांगरा रोडवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा असून या मधील विद्यार्थी काही पूर्णा शहरातील शाळेमध्ये ज्ञानार्जन करतात. शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वरण चपाती भात व मसुरची डाळ हा मेनू देण्यात आला होता. सर्व विद्यार्थी जेवण करून आपापल्या खोलीमध्ये झोपी गेले होते. परंतु अचानक रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान सर्वच विद्यार्थ्यांना मळमळ होणे उलट्या होणे हा त्रास सुरू झाला. एकाचवेळी तब्बल 35 विद्यार्थ्यांना मळमळ-उलटी होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर नंदिनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केले. परंतु प्रकृती अधिकच घसरत असल्यामुळे यातील सर्व 35 विद्यार्थ्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. या सर्वांना त्वरित नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.