
मुंबई वाहतूक पोलीस आता हॉटेल्स, मॉल्स आणि बस ऑपरेटर यांच्याशी संवाद साधणार आहेत. हॉटेल्स, मॉल्स हे त्याच्या जागेचा वापर वाहने पार्किंगसाठी कसे करतात याचा वाहतूक पोलीस आढावा घेणार आहेत.
शहरात काही तारांकित हॉटेल्स, मॉल्सच्या बाहेर वाहने उभी केली जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रकार होतात. वाहतूककोंडीचे नेमके कारण शोधण्यासाठी वाहतूक पोलीस आता मॉल्स, हॉटेल्स आणि बस ऑपरेटर यांच्याशी संवाद साधणार आहेत. मंगळवारपासून हॉटेल्स मॉल्सचे अधिकारी हे त्याचे सादरीकरण करणार असल्याचे सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.
मुंबईत वाहतूककोंडीचे प्रकार होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस विविध उपक्रम हाती घेत आहे. सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस अधिकाऱयासोबत चर्चा केली. वाहतूक कोंडी करणाऱयावर कारवाईसाठी मध्यवर्ती विशेष कक्ष सुरू केले. या मध्यवती कक्षाद्वारे जोरदार कारवाई सुरू आहे. तसेच ऑपेरेशन ऑल ऑफिसर आउट ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत वरिष्ठ अधिकारी ते पोलीस शिपाई हे कारवाईसाठी बाहेर पडतात. तर वाहतूक पोलीस हे नागरिकांशी सर/मॅडम असे आदराने बोलतात.
लॉकडाऊनमध्ये धडक कारवाई
लॉकडाऊन काळात स्थानिक पोलिसांसोबत वाहतूक पोलीस हे रस्त्यावर तैनात होते. 428 वाहतूक पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. 415 वाहतूक पोलिसांनी कोरोनावर मात केली. लॉक डाऊन काळात विना हेल्मेट वाहन चालवणाऱया 4 लाख 71 हजार 620, विना सीटबेल्ट 28715, वेगाने वाहने चालवणारे 55,981, काळ्या काचा असलेल्या 11,637 वाहन चालकांना पोलिसांनी चलन पाठवले आहेत.


























































