
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागलेले असल्याने अनेक राजकीय पक्षांच्या मागणीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांत अर्थ विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले.
नियोजित वेळापत्रकानुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध 8 एप्रिल रोजी संपणार होता, मात्र दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालसह चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा निवडणूक आयोगाने केली. या निवडणुकांसाठी विविध पक्षांचे खासदार व्यस्त राहणार असल्याने त्यातच बंगालची निवडणूक भाजप व तृणमूल काँग्रेसने प्रतिष्ठेची बनवलेली असल्याने संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळले जावे अशी मागणी तृणमूल काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेच्या सभापतींकडे केली होती.
या अधिवेशनात पूरक मागण्या, अर्थसंकल्पावरील चर्चा व अर्थ विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आवश्यक ते संसदीय कामकाज संपल्यानंतर अधिवेशनाचे आज सूप वाजले. अर्थ विधेयकासह विमा दुरुस्ती विधेयक, खाण दुरुस्ती विधेयक, दिल्ली केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांना संसदेने मंजुरी दिली.
मोदी कुठे आहेत…? अन् मोदी अवतरले…
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस खासदार रवनीत सिंग यांचे भाषण गाजले. आज अधिवेशन संपत आहे. आपण परत मतदारसंघात जाऊ, पण तिकडे काय स्थिती आहे. बेरोजगारी बोकाळली आहे, महागाईचा भस्मासुर वाढला आहे. या जनतेशी संबंधित मूळ मुद्दय़ावर पंतप्रधान कधी बोलणार आहेत? ते नेमके आहेत तरी कुठे? संसदेत आहेत की बंगालच्या निवडणुकीत बिझी आहेत, असा टोला रवनीत यांनी लगावला. त्याला संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी हरकत घेतली. रवनीत व मेघवाल यांच्या खडाजंगी वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आल्यानंतर भाजपच्य खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.
मी शिवसैनिक, महिलांचा अपमान कदापि होणार नाही, चौकशी होऊन जाऊ द्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून घडलेला मी शिवसैनिक आहे. महिलांचा सन्मान आम्हाला शिकवला गेलेला आहे. महिलांचा अपमान करणे आम्ही सहनही करू शकत नाही. तरीही माझ्यावर आरोपांची राळ उडविली गेली आहे. तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेच, जी काय चौकशी करायची आहे ती करून टाका, अशा शब्दांत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बेताल आरोप करणाऱया खासदार नवनीत राणा यांना चोख प्रत्युत्तर दिले. खासदार अरविंद सावंत यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप नवनीत यांनी केला होता. त्यावर सावंत यांनी आज आपली भूमिका लोकसभेत मांडली. महिलांचा सन्मान करणे ही आमची शिकवण आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले आरोप गैरलागू आहेत. याची शहानिशा सीसीटीव्ही फुटेज करून करावी. कोणत्याही स्तरावर या प्रकरणाची चौकशी करा, असे आव्हानच सावंत यांनी दिले. माझ्यावर आरोप करणाऱयांचाही पूर्वेतिहास तपासावा, असा टोलाही सावंत यांनी लगावला.
























































