पारनेर 88, कर्जत 87, अकोल्यात 85 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यातील पारनेर, कर्जत आणि अकोले नगरपंचायतींच्या प्रत्येकी चार प्रभागांसाठी चुरशीने मतदान झाले. पारनेरमध्ये 88 टक्के, कर्जतमध्ये 87, तर अकोल्यात 85 टक्के मतदान पार पडले. आज (दि. 19) मतमोजणी होणार आहे. अकोले नगरपंचायत निवडणूक दोन सत्रांत घेण्यात आल्याने महिनाभर प्रचार गाजला. 17 जागांपैकी 13 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान झाले, तर उर्वरित 4 जागांसाठी मंगळवारी 85 टक्के मतदान झाले.

कर्जत नगरपंचायतीमधील चार प्रभागांसाठी 87 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले व सहायक अधिकारी नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. चारही प्रभागांमध्ये मोठय़ा उत्साहात मतदारांनी मतदान केले. सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी दिवसभर गर्दी पाहवयास मिळाली. चार प्रभागांमधील मतदानासाठी पाच मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. एक जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 16 जागांसाठी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

पारनेर नगर पंचायतीच्या चार प्रभागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत एकूण 2 हजार 811 मतदारांपैकी 2 हजार 464 मतदारांनी हक्क बजावला. एकूण 87.66 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक 14 मध्ये दुरंगी, प्रभाग क्रमांक 11 मध्ये बहुरंगी, तर प्रभाग क्रमांक 2 व 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शहर विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. मंगळवारी झालेल्या चार प्रभागांसह एक महिन्यापूर्वी झालेल्या 13 प्रभागांची मतमोजणी उद्या (बुधवारी) बाजार तळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली.