धक्कादायक! दारूच्या नशेत बापाने पाच वर्षाच्या मुलाने जमिनीवर आपटून ठार मारले, नंतर स्वत: घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या बापाने स्वतःच्या पाच वर्षीय मुलाची जमीनीवर आपटून हत्या केली. पत्नीलाही बेदम मारहाण करून नंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे ही घटना घडली. दरम्यान, शाळेत शिकत असलेल्या मुलीला शिक्षकांनी घरी न पाठविल्याने ती मुलगी मात्र बचावली.

पारनेर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार पिंपळगांव रोठा येथील संतोष रासकर हा पूर्वी मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होता. काही वर्षांपूर्वी तो पिंपळगांवरोठा येथे आला व गावातच वाहन चालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी संतोष रासकर व त्याची पत्नी सुजाता यांचे घरगुती कारणातून भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन त्याने पत्नी सुजाता यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दारू पिऊन धुंद झालेल्या संतोषने त्याच रागात त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आदर्श यास स्वयंपाकाच्या ओट्यावर आपटल्याने डोक्यास मार लागून तो जागीच मृत पावला. तर मारहाणीमुळे पत्नी सुजाताही निपचित पडल्या होत्या. पत्नी व मुलगा मृत झाल्याचे समजून घाबरलेल्या संतोष याने घराच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहीती समजल्यानंतर पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुजाता रासकर यांना नगर येथील शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस उपाधिक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जखमी सुजाता यांच्या जबाबानंतर या घटनेमागील खरे कारण पुढे येईल.

शिक्षकांची सतर्कता

दरम्यान, घरातील भांडणानंतर संतोष शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलीस आणण्यासाठी शाळेत गेला होता. त्याचा रूद्रावतार पाहून शाळेतील शिक्षकांनी मुलीस त्याच्यासोबत पाठविले नाही. त्यामुळे मुलगी बालंबाल बचावली.