पारनेरमधील सुपे एमआयडीसीचा तिसऱ्यांदा होणार विस्तार, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुपे एमआयडसीच्या तिसऱया विस्ताराची अधिसूचना करण्यात आली आहे. त्यासाठी हंगे येथील 755 हेक्टर, तर सुपे हद्दीत 80 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी मोजणीप्रक्रिया सुरू होणार आहे. भविष्यात सुपे परिसर राज्यातील एक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून पुढे येणार आहे.

सुपे येथे जुनी एमआयडीसी आहे. तिच्या जवळच म्हसणे फाटा येथे सुपे ‘फेज-टू’ हे नव्याने एक जापनिज हब उभे राहत असून, तेथे अनेक परदेशी कंपन्या येत आहेत. त्यानंतर आता सुपे व हंगे येथे नव्याने ‘फेज थ्री’साठी भूसंपादन करण्याबाबत अधिसूचना जारी झाली आहे.

नगर-पुणे महामार्गावर पुणे व संभाजीनगर एमआयडीसीपासून साधारणपणे शंभर किलोमीटरवर सुपे एमआयडीसी येते, तसेच शिक्रापूर, चाकण, रांजणगाव या एमआयडीसीपासून जवळ असल्याने, सुपे औद्योगिकदृटय़ा मध्यवर्ती ठिकाण होणार आहे. सुपे येथे एमआयडीसीचा तिसरा फेज होत असून, हंगे येथील 755, तर सुप्यातील 80 हेक्टर, अशी एकूण 835 हेक्टर भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तेथे लवकरच मोठे आयटी क्षेत्र उभे राहणार आहे.

सुप्यात सुरुवातीला 1992मध्ये एमआयडीसीचा पहिला फेज 307.11 हेक्टरवर सुरू झाला. तेथे 314 भूखंड झाले. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मोठे उद्योग आले नाहीत. अनेकांनी फक्त औद्योगिक प्लॉट घेतले. मात्र, उद्योग उभारले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मोकळेच आहेत. नंतर म्हसणे फाटा येथे फेज-टू जापनिज हब या नावाने 946.70

हेक्टर क्षेत्र संपादित होण्यास सुरुवात झाली. पैकी 80 टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. मोठे अनेक उद्योग येथे येण्यास इच्छुक आहेत. काही उद्योग सुरूही झाले आहेत. आता नव्याने हंगे व सुपे येथील एकूण 835 हेक्टरवर नव्याने ‘फेज-थ्री’साठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रोजगाराच्या संधी मिळणार

– सुपे येथे तिन्ही एमआयडीसी सुरू झाल्या, तर तालुक्यातीलच नव्हे, तर जिह्यासह राज्यभरातील अनेकांना रोजगाराच्या अनेक संधी मिळणार आहेत. त्यातून या परिसरातील उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार आहे. सुपे एमआयडीसीमुळे राज्याला एक नवी ओळख प्राप्त होणार आहे.