
पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1800 कोटींच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने राजीनामा देण्याची गरज आहे. तसेच हा व्यवहार रद्द करणारे ते कोण? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? अजित पवारांनी राजीनामा द्यावा. दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर व्यवहार रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. बावनकुळे म्हणतात पैसे नको. व्यवहार रद्द करून हवा आहे. हा व्यवहार मोदी पण रद्द करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. क्रिमिनल लायबिलिटी तपासत नाही, तोपर्यंत हा व्यवहार रद्द करता येत नाही. हा व्यवहार रद्द केला तर आपण न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासूनच रोखण्यात आले. यानंतर संतप्त झालेल्या दमानिया यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
याबाबत, अंजली दमानिया म्हणाल्या की, मी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आले होते. परवानगी नसेल तर आत सोडता येणार नसल्याचं बोटॅनिकल सर्व्हेचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला दोन जणांना जाऊ द्या, पाहणी करू द्या, अशी विनंती त्यांना केली. त्यांनी ती परवानगीही नाकारली. तसेच ते आमच्याशी उद्धटपणे बोलले. त्यांना कोणाचे फोन आल्यावर त्यांनी नकार दिला हे माहित नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पत्रकार परिषद घेईल. मुठे समितीचा अहवाल सोमवारी येणार आहे. कोणताही अहवाल आला की, कोणतीही समिती असं म्हणू शकत नाही की, हे कायदेशीर झाले आहे. बॉटनिकल गार्डनला जागा लीजवर दिली होती. 2028 पर्यंत देण्यात आली होती. रिसर्चसाठी जमीन दिली होती. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आपण आलो होतो. मात्र, त्यांनी मला परवानगी नाकारली. अधिकारी अतिशय उद्धट आहेत. लोक कशासाठी लढतात जे त्यांना माहीत नाही, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. आता आपण याबाबत उद्या पत्रकार परिषद घेत मोठी माहिती देणार असल्याचे सांगितले.





























































