
मराठमोळ्या पार्थ साळुंखेने जागतिक युवा (21 वर्षांखालील) तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने रिकर्व प्रकारातील थरारक सुवर्णपदकाच्या लढतीत कोरियाच्या सोंग इंजूनचा 7-3 असा पाडाव केला. हिंदुस्थानने या स्पर्धेत 11 पदकांची लयलूट करीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
साताऱयाच्या 19 वर्षीय पार्थ साळुंखेने अंतिम फेरीत सोंग इंजूनचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26 असा पराभव केला. पार्थने 10पैकी 10 गुण मिळवणारे दोन, तर 10पैकी 9 गुण मिळवणारा एक निशाणा साधला. त्याने फायनलमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (एकमद मधोमध निशाणा साधणे) निशाणे साधत दमदार शेवट केला.
भाजा कौरला कास्य
महिला रिकर्व वैयक्तिक प्रकारात हिंदुस्थानच्या भाजा कौरने तैवानच्या सू सीन-यूचा 7-1 (28-25, 27-27, 29-25, 30-26) असा पराभव करीत कास्य पदक जिंकले. हिंदुस्थानने या स्पर्धेत 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्य अशी 11 पदकांची लयलूट करीत पदकतक्त्यामध्ये अव्वल स्थान काबीज केले आहे.


























































