दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात, दोन प्रवाशी विमानांची समोरासमोर टक्कर

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) गुरुवारी सकाळी मोठा अपघात झाला. ‘फ्राय दुबई’च्या (FlyDubai) बोइंग 737-800 आणि बहरीनच्या ‘गल्फ एअर’ (Gulf Air) या दोन प्रवाशी विमानांची टॅक्सी वे वर समोरासमोर टक्कर झाली. सुदैवाची गोष्ट म्हणजे अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही.

या अपघाताबाबत माहिती देताना विमानतळ प्रशासनाने म्हटले की, फ्लाय दुबईचे विमान किर्गिस्तानकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना हा अपघात झाला. अपघातात विंगटिपचे नुकसान झाले आणि त्यामुळे विमानाला उड्डाण घेता आले नाही. विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने इच्छित स्थळाकडे रवाना करण्यात आले. तसेच या अपघाताची संयुक्तपणे चौकशी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच ‘गल्फ एअर’ने या अपघाताबाबत म्हटले की, आमच्या एका विमानाची दुसऱ्या एअरलाईन्सच्या विमानाशी टक्कर झाली. यामुळे विमानाच्या मागच्या बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघातात एकाही प्रवाशाला दुखापत झाली नसून सर्वांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत.

रन वे काही तासांसाठी झाला बंद

दरम्यान, विमानतळाच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, या अपघातामुळे रन वे काही तासांसाठी बंद करावा लागला. दोन तासांच्या कवायतीनंतर रन वे पुन्हा सुरू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या