
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या एसी लोकलमध्ये कुलिंग व्यवस्थित होत नसल्याने रेल्वेतील प्रवाशांनी आज रेल्वे अडवून धरत आंदोलन केले. प्रवाशांच्या या आंदोलनामुळे रेल्वेच्या या एसी लोकलची पोलखोल झाली आहे. दरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणी आरपीएफचे पोलीस दादागिरी करताना दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या एका पत्रकाराला दमदाटी करत आरपीएफच्या पोलिसांनी त्या पत्रकाराचा कॅमेरा खाली पाडला.
आज सकाळी आठच्या सुमारास एसी लोकल बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने निघाली होती. मात्र एसी लोकलमध्ये एसीचे कुलिंगच होत नव्हते. त्यात दरवाजे पूर्ण बंद असल्याने आतील प्रवासी घामाने डबडबले होते. त्यामुळे प्रवाशांनी अंधेरी स्थानक येताच एसी लोकलचा दरवाजा अडवून धरला व आंदोलन केले. ‘एसी लोकलसाठी रेल्वे प्रवाशांकडून जवळपास दुपटीपेक्षा अधिक भाडे घेते. एसी लोकलमध्ये बसून आरामात प्रवास करता यावा यासाठी आम्ही ही रक्कम मोजतो पण जर लोकलमधला एसी चालतच नसेल तर एसी लोकलचा काय उपयोग?, असा सवाल आंदोलन करणाऱ्या प्रवाशांनी केला. काही वेळाने एसी लोकलला अडवून धरणाऱ्या प्रवाशांना शांत करण्यासाठी आरपीएफचे काही पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र या पोलिसांनी या घटनेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या एका पत्रकारालाच दमदाटी करत रेकॉर्डिंग थांबवायला सांगितले. सदर व्यक्ती आपण पत्रकार असल्याचे पोलिसांना सांगत होती. तरिही पोलिसांनी त्याचा कॅमेरा पाडला.




























































