एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, मुलांच्या संगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची रजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, मेगा भरती असे मोठे निर्णय घेतल्यानंतर आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक खूशखबर दिली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही आता मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळणार आहे. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे.

एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात 6ऐवजी 9 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील. मुलाचे वय 18 वर्षांचे होईपर्यंत ही रजा घेता येईल. एका वर्षात 2 महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येईल. पहिल्या 2 ज्येष्ठतम मुलांकरिता ही रजा घेता येणार आहे.

एसटीत महिला भरतीला प्राधान्य
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठय़ा प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेषकरून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत असल्याचे दिवाकर रावते म्हणाले.