संकट पाठ सोडेना, मुंबईहून परभणी जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात; 21 जखमी

537

मुंबई येथून परभणी जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटून 21 जण जखमी झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे घडली. या दुर्घटनेतील 11 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले असून यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील काही मजूर मुंबई येथे मजुरी करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी गेले होते. हे सर्व मजूर चंदू राजाराम मांजरे या ठेकेदाराच्या हाताखाली काम करत होते. मात्र सध्या कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर या सर्व 48 मजुरांना घेऊन मांजरे हे मध्यरात्री मुंबई येथून निघाले. पुणे व नगर मार्गे ते तालुक्यातील खरवंडी कासार येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास  आले असताना खरवंडी गावाच्या अलीकडे असलेल्या वडाची भेट या ठिकाणी असलेल्या वळणावर त्यांचा टेम्पो पलटी झाला. या ठिकाणाहून दुचाकीवरून जाणाऱ्या काही तरुणांनी टेम्पोच्या मागील बाजूस असलेले शटर उघडून सर्व जखमींना बाहेर काढले व त्यांना खरवंडी कासार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. यातील 11 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असून यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा समावेश आहे.

उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पो. निरी. रमेश रत्नपारखी, सहायक निरीक्षक वसंत पवार यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली. टेम्पो चालकाने टेम्पोच्या मागील बाजूस माल असलेले काही पोते ठेवले होते व या पोत्याच्या मागे मजुरांना बसवले असल्याने मुंबई ते खरवंडी कासार या चेकपोस्टवर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना कोणताही संशय न आल्याने हा टेम्पो पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपर्यंत येऊ शकला. या घटनेत ठेकेदार मांजरे यांच्यासह टेम्पो मालक फुलन पंडित धोत्रे व टेम्पो चालक संतोषकुमार लालबहादूर यादव हे सुद्धा जखमी झाले आहेत. या संदर्भात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

आपली प्रतिक्रिया द्या