
पाथरी शहरातील 222 या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्ष उलटली. शहरातून याच महामार्गावरून संबंधीत एजन्सीने रस्ता दुभाजकाचे बांधकाम केले आहे. हा दुभाजक ओलांडण्यासाठी कोणत्याही वाहतूक नियमांचे पालक होत नसल्याने हा रस्ता दुभाजक अनेकांचे प्राण घेत मृत्युचा सापळा बनला आहे.
पाथरी शहरातील विटा कॉर्नर ते पोखर्णी फाटा कार्नर असा रस्ता दुभाजक 222 या महामार्गावर शहरातून बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत पाथरी बसस्थानक असल्याने स्थानकातून बसेस बाहेर अथवा आत जाण्यासाठी या दुभाजकाचा उपयोग होत नाही. त्यामुळे स्थानकातून बाहेर निघालेली बस चक्क रस्त्याच्या विरुद्ध बाजूने या महामार्गावर धाव घेते. त्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात होत असतात. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी चौक (सेलू कॉर्नर) या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी अपघात होण्याचीही भीती निर्माण झाली असून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्याही वाहतुक पोलीसाची नियुक्ती दिसून येत नाही. तर शहरातील नागरिकांसह इतर वाहनधारकांनाही सतत विरुद्ध दिशेने वाहतूक करूनच हे रस्ता दुभाजक काही अंतरापर्र्यंत पार करावे लागत आहे. या रस्त्यावरील काही दुकानदारांनी तर हे दुभाजक चक्क कापून त्या ठिकाणी ग्राहकांच्या ये-जा करण्यासाठी सोय करून नामी शक्कल लढविल्याचे चित्र दिसत आहे.
मागील 2 वर्षांत याच 222 महामार्गावर विटा कॉर्नर ते पोखर्णी फाटा कॉर्नर या परिसरात रस्ता दुभाजक ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे या रस्ता दुभाजकाचा नेमका उपयोग काय? असा सवाल येथील संतप्त नगरिक बोलून दाखवत आहेत. पयार्याने या महामार्गाचा शहरालगत पर्यायी रस्ता (बायपास) होणे अत्यंत आश्यक आहे. शहरातील वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने आता तरी जागे होऊन या ठिकाणी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करून वाहतूक नियमांची अंमलबजाणी करून जनमसान्यांचे प्राण वाचविण्यास पाऊल उचलावेत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधाकरातून जोर धरू लागली आहे.


























































