
पंजाबमधील पतियाळा येथे शिवसेनेने खलिस्तानविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. खलिस्तान समर्थकांनी या मोर्चाला विरोध केल्याने धुमश्चक्री झाली. शुक्रवारी घडलेल्या या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी या घटनेचा मास्टरमाईंड बरजिंदर परवानासहित चार जणांना अटक केली आहे.
पतियाळाचे नवे आयजी मुखविंदर सिंग छिना यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी 6 एफआयआर नोंदवले असून, त्यामध्ये 25 जणांची नावे आहेत. यापैकी हरीश सिंगला, कुलदीप सिंग आणि दलजीत सिंग यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या घटनेचा सूत्रधार असणाऱया परवाना यालाही अटक करण्यात आल्याने आता या संपूर्ण कटाचा पर्दाफाश होईल.
हरीश सिंगला यांची हकालपट्टी
खलिस्तानविरोधी मोर्चा काढणारे स्थानिक शिवसेना पदाधिकारी हरीश सिंगला यांना पोलिसांनी अटक केली असून कोठडीत चौकशी केली जात आहे. दरम्यान शिवसेनेचे पंजाब प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा यांनी हरीश सिंगला यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे.
आयजी, एसएसपी यांना हटवले
पतियाळा येथे खलिस्तानविरोधी मोर्चात झालेल्या हिंसाचारानंतर सरकारने पतियाळाचे आयजी राकेश अग्रवाल आणि एसएसपी नानक सिंग यांना हटवले आहे. डीएसपी अशोक कुमार यांनाही हटवण्यात आले आहे.

























































