
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
तेल, साबण, शॅम्पू व कडधान्य विकणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमुहाने दूरसंचार क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री केली आहे. पतंजलीने सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल BSNL) या दूरसंचार कंपनीबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत पतंजलीने ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ लॉन्च केले आहे. प्राथमिक टप्प्यात हे कार्ड पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आले आहे. महिनाभरात ते सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्राहकाने पतंजलीने ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ घेतल्यानंतर त्याला रोज २ जीबी डाटाबरोबरच जीवन वीमा व इन्शुरन्सही मिळणार आहे. हे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना २.५ लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स व ५ लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे. परंतु विम्याची रक्कम फक्त रस्ता दुर्घटनेसाठी मिळणार आहे.
पतंजलीच्या ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’वर काही ऑफरही देण्यात आल्या आहेत. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ वापरणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या सर्व उत्पादनांवर १० टक्के सवलतही मिळणार आहे.

























































