
देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. देशात सध्या कोणाचीही लाट नसून केवळ महागाई, चिंता व निराशेची लाट आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी आज केली.
जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्दय़ांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्दय़ांना पुढे रेटत आहे. महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे व त्यावर सरकारकडे उत्तरही नाही, सरकार महागाईच्या मुद्दय़ांवर बोलण्यास घाबरत आहे असे पवन खेरा म्हणाले. महागाईच्या मुद्दय़ांवरच 4 सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले असून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे.

























































