
पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात पाकिस्तानविरोधी वातावरण निर्माण झाल्याचा फटका थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) बसत आहे. हिंदुस्थानी संघाच्या कठोर भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पीसीबीने आता थेट वर्ल्ड चॅम्पियन्स लीग या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पहलगाम हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुस्थानच्या लिजंड संघाने आधी साखळीत आणि नंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानी संघांशी खेळण्यास नकार दिला आणि स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे चिडलेल्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, ‘आगामी काळात पाकिस्तानची कोणतीही टीम किंवा खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार नाहीत.’ या निर्णयामागे हिंदुस्थानकडून मिळालेला अपमान आणि आयोजकांकडून झालेली कथित अवहेलना ही दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले.
ही स्पर्धा मुख्यतः निवृत्त क्रिकेटपटूंकरिता आयोजित केली जाते. हिंदुस्थानकडून ‘इंडिया चॅम्पियन्स’ संघात शिखर धवन, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र पाकिस्तानविरोधात खेळण्यास हिंदुस्थानी खेळाडूंनी दोन वेळा स्पष्ट नकार दिला. एकदा गट चरणात आणि नंतर उपांत्य फेरीतून हिंदुस्थानने माघार घेतली. या घडामोडीमुळे पाकिस्तान थेट अंतिम फेरीत पोहोचला तरी अंतिम सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला.
पीसीबीच्या बैठकीत नकवी यांनी रोष व्यक्त करत आयोजकांवरही ताशेरे ओढले. ‘जेव्हा इंडिया चॅम्पियन्स संघ खेळलाच नाही तेव्हा त्यांना गुण का देण्यात आले?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हिंदुस्थानच्या राजकीय भूमिकेचा आणि खेळाडूंच्या निषेधाचा फटका पाकिस्तानला केवळ मैदानातच नव्हे, तर त्याच्या खेळ धोरणांवरही बसताना दिसत आहे. आता वर्ल्ड चॅम्पियन्स लीगमधून पाकिस्तानच्या अनुपस्थितीने या स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.