पाकिस्तानचा क्रिकेट संघ 14 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तानच्या 18 सदस्यीय संघाच्या दिमतीला तब्बल 17 जणांचा सपोर्ट स्टाफ ठेवण्याचा हास्यास्पद प्रकार पीसीबीने केला आहे. पीसीबीचा इतका मोठा सपोर्ट स्टाफ पाठविण्याचा निर्णय पाकिस्तानी चाहत्यांना काही रुचलेला नाही. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावरून पीसीबीची चांगलीच खरडपट्टी केल्याचे समोर आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानने नुकतीच आपल्या संघाची घोषणा केली. याचबरोबर संघासोबतचा सपोर्ट स्टाफही जाहीर करण्यात आला. पाकिस्तानने यापूर्वीच उमर गुल आणि सईद अजमलला पाकिस्तान संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या इतर सपोर्ट स्टाफचीदेखील यादी प्रसिद्ध केली. इंग्लंडचा माजी फलंदाज अॅडम होलिओकला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर सिमॉन ग्रांट हेलमोट हे उच्च कामगिरी प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत.