
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाकिषयक कार्यक्रमांना पुढील सूचना येईपर्यंत परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे. मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (पीडीसीए) आपली सदू शिंदे लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरूच ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार याकडे तमाम पुणेकरांचे लक्ष असेल.
जीवघेण्या कोरोना विषाणूचे महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी शाळा-महाविद्यालयांसह अनेक गर्दीची ठिकाणे बंद केली आहेत. सरकारचे आदेश न पाळणाऱया व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. सरकारी आदेश येऊन दोन दिवस झाले तरी ‘पीडीसीए’ची सदू शिंदे लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरूच आहे.
पुणे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाकिषयक कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहे. मात्र तरीही ‘पीडीसीए’कडून स्पर्धा सुरूच असेल तर ही गंभीर बाब आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.’ – नवल राम किशोर (जिल्हाधिकारी)





























































