
नॉर्वेमधील जेकॉबसेल्वा नदी पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. या नदीच्या एका बाजूला नॉर्वे हा देश आहे तर दुसऱ्या बाजूला रशिया. यामुळे या नदीचा किनारा हे जगातील सगळ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनले आहे. ही नदी दोन देशांमधील सीमारेषा बनली आहे. या नदीच्या किनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी नॉर्वे सरकारने एक सूचना फलक लावला आहे. यावर सूचना लिहिण्यात आली आहे की रशियाच्या दिशेने तोंड करून लघुशंका करू नये. सूचनेचं कठोर पालन व्हावं यासाठी नदीच्या किनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याद्वारे सुरक्षारक्षक 24 तास लक्ष ठेवून असतात. जर कोणी नियम मोडला तर त्याला दंड ठोठावण्यात येतो. नियम मोडणाऱ्याकडून 25,214 रुपयांचा दंड वसूल केला जातो.
नॉर्वेचे सीमा आयुक्त जेन्स होईलंड यांनी द बॅरेटस ऑब्झर्व्हर या वर्तमानपत्राशी बोलताना सांगिलं की या सूचना फलकांचा नुकत्याच घडलेल्या घटनांशी काही संबंध आहे का याबाबत त्यांना माहिती नाही. या भागात सैनिकांचा खडा पहारा असतो आणि हे सैनिक पर्यटकांना सातत्याने रशियाच्या दिशेने तोंड करून लघुशंका करू नये अशी ताकीद देत असतात असंही त्यांनी सांगितलं. दोन देशांमधील कराराचं कोणत्याही पर्यटकांने उल्लंघन करू नये यासाठी त्यांना जाणीव करून दिली जात असते. जर कोणी असा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. रशियाच्या दिशेने तोंड करून कोणतेही अचकट विचकट हावभाव करणे, आरडाओरडा करणे, आक्षेपार्ह गोष्टी करणे हे बेकायदेशीर मानलं जातं, तसं 1950 साली दोन देशांत झालेल्या करारानंतर तयार करण्यात आलेल्या नॉर्वेच्या कायद्यातच म्हटले आहे.


























































