
पेगॅसस आणि कृषी कायद्यांसह इतर मुद्दय़ांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नाही. पेगॅससच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी विरोधी पक्ष आग्रही आहे. मात्र सरकारला या मुद्दय़ावर चर्चा नको असल्याने संसदेतील कामकाजाचा पेच कायम आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पेगॅससच्या मुद्दय़ावरून गदारोळाला सुरुवात झाली. तालिका सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्याने कामकाज दुपारी साडेबारा, त्यानंतर दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही गदारोळ कायम राहिला. कामकाज सुरू होताच पेगॅससच्या मुद्दय़ावरून विरोधक आक्रमक झाले. गोंधळातच कामकाज दुपारी बारापर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर दुपारी दोन व नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.





























































