‘स्पायवेअर’चा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात आज नेत्यांपासून अनेक बडय़ा बडय़ा सेलिब्रिटींना ‘पेगॅसस’ची भीती लागून राहिली आहे. अतिशय सहजपणे कोणताही फोन हॅक करू शकणारा पेगॅसस हा एक ‘स्पायवेअर’ आहे. गंमत म्हणजे आज राजकीय नेते, पोलीस, वकील, अभिनेते, अभिनेत्री या ज्याच्या त्याच्या तोंडी असलेले हे ‘पेगॅसस’ नाव सगळ्यात आधी हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना माहिती होते. ‘पेगॅसस’ नावाचे एक कीटकनाशक आहे, जे शेतकरी वर्गात बरेच लोकप्रिय आहे. पण सध्या चर्चेत असलेला ‘पेगॅसस’ मात्र मोबाईलमध्ये शिरून त्याची वाट लावणारा एक कीटक आहे असं म्हणायला हरकत नाही. या ‘पेगॅसस’च्या चर्चेने इतका धुमाकूळ घातला आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मोबाईलमध्ये तर हा ‘स्पायवेअर’ नाही ना? आपल्या मोबाईलवर कोणी पाळत तर ठेवलेली नाही ना? असे प्रश्न पडू लागले आहेत. लोकांमधील याच घबराटीचा फायदा घेत, काही बनावट कंपन्या आणि हॅकर्स लोकांना ‘पेगॅसस’ शोधण्यासाठी बनावट सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस ऑप्लिकेशन्सचे आमीष दाखवत आहेत. मात्र अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडून ही बनावट सॉफ्टवेअर आणि ऑप्लिकेशन्स आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका! त्यातील स्पायवेअर, मालवेअर तुमची महत्त्वाची माहिती, पासवर्ड, बँकाचा तपशील हातोहात लांबवून नेतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘पेगॅसस’ या स्पायवेअरचे कोडिंग इतक्या उच्च दर्जाचे आहे की, त्याला कोणत्याही दुसऱ्या प्रोग्रामच्या मदतीने ‘ट्रेस’ करता येणे अशक्य आहे. त्याच्या कोडिंगच्या जोरावर हा पेगॅसस ‘अँटीव्हायरस’नादेखील सहजपणे बायपास करतो. ‘पेगॅसस’चा माग काढण्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या प्रोसेसला मॉनिटर करावे लागते आणि हे फक्त आणि फक्त एखाद्या ‘फॉरेन्सिक लॅब’मध्येच करणे शक्य आहे. अनेक सायबर सुरक्षा तज्ञ या ‘पेगॅसस’ स्पायवेअरला सगळ्या व्हायरसचा बाप अशी उपाधी देत आहेत; यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज येणे सहज शक्य आहे. ‘पेगॅसस’पासून बचाव करण्यासाठी मोबाईलचे ‘फर्मवेअर’ अपडेट ठेवणे हा सगळ्यात खात्रीचा उपाय आहे. त्यामुळे आपला मोबाईल नेहमीच व्यवस्थित अपडेट ठेवा, सिक्युरिटी पॅच अपडेट करत राहा. सावध राहा, सुरक्षित राहा.