
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या एसटी महामंडळाच्या जादा बसगाड्यांना बेस्टच्या आणिक आणि प्रतीक्षा नगर आगारात उभ्या करण्यासाठी जागा द्यावी. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये अशी मागणी आज बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली. मात्र माफक दरात पार्किंगची सोय करण्याबद्दल आपण परिवहनमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकांनी दिले.
गणेशोत्सव काळात कोकणात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. यंदा 220 च्या वर जादा गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाला पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती व नागपूर या विभागातून बस आणाव्या लागतात. त्या बस गणेशोत्सवाच्या आठवडापूर्वीच मुंबईत दाखल होत असतात. या बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या परळ, मुंबई सेंट्रल व कुर्ला–नेहरूनगर आगारात उभ्या केल्या जातात, मात्र तेथेही पार्किंगची मर्यादा असल्याने एसटीला वेगळ्या जागेची गरज पडते. यंदा एसटी महामंडळाने बेस्टला पत्र पाठवून बेस्टच्या आणिक व प्रतीक्षा नगर आगारातील जागेची मागणी केली आहे.
एसटीच्या या पत्रावर बेस्टने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने एसटी महामंडळाला 100 कोटींच्या आसपास आर्थिक फटका बसला आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाकडून भाड्यापोटी लाखो रुपये घेणे योग्य नसल्याचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी म्हटले आहे.
बेस्टच्या नियमात बसत नाही
एसटी बसगाड्यांना मोफत पार्किंग देणे हे नियमात बसत नाही. बेस्टने नुकत्याच लागू केलेल्या बस आगारातील पार्किंग पॉलिसीनुसार 200 रुपये आकारण्यात येतील. मात्र परिवहनमंत्र्यांबरोबर चर्चा करून पुढील तोडगा काढण्यात येईल व लवकरच तो सर्वांना कळवण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.


























































