
सामना प्रतिनिधी । येवला
ऐन गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना शहरातील मेन रोडवरील सिध्दिविनायक गणपती मंदिरातील दानपेटीची चोरी करून गणेश भक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन चोरट्यांना दानपेटीसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तिघांनाही शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर मंगळवारी हजर करण्यात येणार आहे.
शहरातील मेन रोडवरील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात अज्ञात चोरट्याने 12 सप्टेंबरच्या मध्यरात्री संरक्षक भिंतीचे कुलूप तोडून सभामंडपातील दानपेटीची चोरी केली होती. सुमारे 90 किलो वजनाची लोखंडाची असलेली ही दानपेटी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. चोरटय़ांनी दानपेटीवरील छोटासा कळस तोडून मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या बाजार चालतच टाकून दिला होता. गणेशोत्सवात सदर चोरीची घटना घडल्याने शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासाची चक्रे देण्यात आल्यानंतर अवघ्या पाचच दिवसात या पथकाला तिघा चोरटय़ांना गजाआड करण्यात यश आले आहे.
चोरीच्या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी त्यांचे पथकासह येवला, मनमाड, नांदगाव तसेच आजुबाजूचे परिसरातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मिलिंद ऊर्फ मन्या खंडीझोड (28) रा. आंगणगाव, ता. येवला, यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस खाकी दाखविताच त्याने त्याचे साथीदार सागर पवार, (25), रा. पारेगाव रोड, येवला व शंकर राखपसरे, (28), रा. अंगणगाव, ता.येवला यांना ताब्यात घेतले त्यांनी सदरची चोरी केली असल्याची कबुली दिली. वरील आरोपी मिलिंद ऊर्फ मान्य याचे ताब्यातून चोरीस गेलेली दानपेटी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्हय़ात वापरलेली लाल रंगाची बजाज पल्सर मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.

























































