
सामना प्रतिनिधी । जालना
पिंपरी गावाजवळील टोलनाका चालविणाऱ्या के.टी. कन्स्ट्रक्शन इंदोर कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने दर दिवशी १२ हजाराचा दंड दंड ठोठावत चांगलाच झटका दिला आहे. रस्ता देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
टोल जमा करणाऱ्या के.टी. कन्स्ट्रक्शन इंदोर कंपनीने वाहनधारकांना योग्य प्रकारची सेवा पुरविणे अपेक्षित आहे. कंपनीला रस्ता देखभाल व दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु, कंपनीने त्या अनुषंगाने काही कार्यवाही केली नाही. तसेच वाहनधारकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही नेमण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत सदर कंपनीस दंड लावण्याचे तसेच आठ दिवसात काम सुरु न केल्यास टोल वसुली रद्द करण्यासाठी निर्देश दिले होते त्यानुसार सदर कंत्राटदार कंपनीस १ जूनपासून दरदिवशी १२ हजार याप्रमाणे दंड आकाराला जात आहे.
खाजगीकरणांतर्गत जालना वाटुर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून सदरील रस्ता जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून आता सार्वजनिक बांधकाम विभाग परतूरला हस्तांतरित करण्यात आला असून सदर रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. सदरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश ही देण्यात आले आहे. जालना हा रस्ता केटी कन्स्ट्रक्शन इंदोर यांच्यामार्फत झालेला असून सदर रस्त्याची किंमत शंभर कोटी असून त्यामध्ये शासनाचा सहभाग ३८ कोटी आहे. सदरील रस्ता जालना वाटुर हा रस्ता ४५ किलोमीटर असून. सदरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात सध्या दुरवस्था झालेली असून डीवाईडरच्या मध्ये वृक्षलागवड करणे आवश्यक असताना वृक्ष लागवड केलेली नाही. काम तातडीने न केल्यास या रस्त्यावरिल टोलवसुली रद्द येणार आहे.






























































