परभणीत हद्दपार आरोपीला शस्त्रास्त्र साठ्यासह अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरातून हद्दपार करण्यात आलेला जुना पेडगाव रोड येथील आरोपी बिबनसिंह बावरी हा त्याच्या राहत्या घरात असल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडे प्राणघातक शस्त्र, गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे, धारदार तलवार आदी शस्त्रास्त्र साठ्यासह अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन घेण्यात आले. यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान परभणी शहरातील विविध गुन्ह्या संदर्भात माहिती संकलीत करुन त्यात शरीरास इजा करणारे गुन्हेगार, फरारी आरोपी याचा शोध आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.

यावेळी तडीपार आरोपी आणि अवैध धंदे करणारे गुन्हेगार असे एकूण ३७ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान परभणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हेगार तपासणी चालू असताना मध्यरात्रीच्या दरम्यान नाका येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने खबर्‍यांमार्फत माहिती काढली. यात परभणी शहरातून हद्दपार असलेला आरोपी बिबनिंसग बावरी हा आपल्या राहत्या घरी असल्याची माहिती उपलब्ध झाली. सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.  राहत्या घराची झाडाझडती घेतली असता प्राणघातक शस्त्र, गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे, धारदार तलवार आदी शस्त्रास्त्र साठ्यासह अटक करण्यात आली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनील गोपीनवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीने सदर शस्त्रसाठा कोठून आणला आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता, या बाबतचा तपास नानलपेठ पोलीस करत आहेत. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत.