एमएसएफच्या जवानावर हल्ला करणारा गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर चाकू हल्ला करणायाला मंगळवारी बोरिवली रेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशील यादव असे त्याचे नाव आहे. त्याने त्याच्या नातेवाईकावरही हल्ला केला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

सुमित कारंडे हा 14 मार्चला तो बोरिवली च्या फलाट क्रमांक 6/7 येथे कर्तव्यास होता. तेव्हा सुशील हा संशयास्पद फिरताना सुमितला दिसला. सुमित त्याला पुढील चौकशी करता बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नेत होता. तेव्हा सुशीलने खिशातून चाकू काढून सुमितच्या पोटावर वार केले. चाकू हल्ल्यात सुमित गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती कळताच बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी घटना स्थळी गेले. चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून मंगळवारी सुशीलला अटक केली. त्याला न्यायालयाने 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

हल्ल्याची माहिती लिहिली नोंद वहीत 

सुशील ने गोरेगाव रेल्वे स्थानकात एका नोंदवहीत मिलिटरीच्या जवानांवर हल्ला केल्याचे लिहिले होते.  त्याने मोबाईल नंबर आणि गावचा पत्ता लिहिला होता. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुशीलने काही दिवसांपूर्वी त्याच्या काकीवर चाकूने हल्ला केला होता. हल्ला प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी सुशीलला उपचाराकरता कूपर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला नायर रुग्णालयात नेले. सुशीलची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्याने ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. नुकताच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी सुशील ला अटक केली.