मुलांच्या विकासाचा जीवनव्यापी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आश्लेषा महाजन 

इंग्रजी भाषेच्या आकर्षणमुळे मातृभाषा दुरावतेय हे खरं असलं तरी अवांतर वाचनानेही भाषिक ज्ञान वाढवता येतेच. परंतु  पुस्तकं वा साहित्य म्हणजे पाठय़पुस्तकं हा गैरसमज आहे. खरंतरअवांतर वाचन, बालसाहित्य मुलांच्या भाषिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असतात. मुलांच्या विकासासाठी मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहेच. नुकत्याच झालेल्या बालदिनानिमित्त मातृभाषा आणि बालसाहित्य यांचे महत्त्व सांगणारा लेख.

आजच्या मराठी बालसाहित्यापुढे अनेक आव्हाने आहेत. ती जशी लेखकांपुढे, प्रकाशकांपुढे, ग्रंथविक्रेत्यांपुढे आहेत तशी पालकांपुढे नि शिक्षकांपुढेही आहेत. मुले वाचत नाहीत, वाचन संस्कृती लोप पावतेय असे चित्र दिसतेय. वास्तविक, आज आपल्या तोंडी असलेली वा मुद्रित माध्यमांतून भेटणारी आपली भाषा काळाची घुसळण करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आज आपल्याला कुठलाही महागडा क्लास न लावता आईकडून वरदानस्वरूप ‘फुकट मिळालेल्या’ या भाषेकडे आपण, आपली मुले किती गांभीर्याने बघतो?

वास्तविक, मातृभाषा उत्तम असेल तरच अन्य भाषा उत्तम प्रकारे शिकता येतात, भाषांचा तौलनिक अभ्यास नीट होतो, पण इंग्लिश मीडियमच्या आकर्षणामुळे आज आपली मातृभाषा दुरावते आहे. वाचन ही पुढची गोष्ट, आधी मुलांनी मराठीत बोलावे म्हणूनही प्रयत्न करावे लागत आहेत. मराठी भाषासुद्धा अर्थार्जनाची व परदेशगमनाची दारे उघडून देणारी भाषा ठरू शकते. मराठी मालिका, चित्रपटांना व्हॉईस ओव्हर देणे, अनुवाद करून सबटायटल्स देणे या मनोरंजन क्षेत्रातल्या मोठय़ा संधी आहेत. अनेक मराठी वक्ते, भाषा तज्ञ, लेखक, कवी, अनुवादक, दुभाषी, गायक, नृत्य कलाकार, अभिनेते आदींना देशविदेशात मागणी आहे. आपण पालक-शिक्षकांनी या गोष्टी मुलांना सांगायला हव्यात. कारण भाषा हा मानवाच्या विकासाचा जीवनव्यापी प्रवास असतो.

दृक-श्राव्य माध्यमांचा, टीव्ही, संगणक, मोबाईलच्या पडद्यांचा मुलांवरच काय, मोठय़ांवरही पगडा आहे. जी कथा पडद्यावर दिसते, साकारते, मग ती वाचायची कशाला? असा प्रश्न मुलांना पडतो. वाचनातून कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात ते ‘बघ्यां’च्या बाबतीत घडू शकत नाही. आदिम काळात गुहेतील भिंतीवर आदिमानव भावदर्शन करण्यासाठी वेडीवाकडी चित्रे, मुखवटे काढत असे. आजही स्मार्टफोनच्या व्हर्च्युअल गुहेच्या भिंतीवर (वॉलवर!) आपण चित्रविचित्र ‘इमोजीज’ तसेच अन्य तयार चित्रे वापरून भाषेचा संकोच करत आहोत. पुन्हा चित्रलिपीकडे, कदाचित निःशब्दतेकडे काळाच्या उलटय़ा दिशेने जात आहोत. याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.

हल्ली शाळांमध्ये आनंददायी शिक्षण, क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम या योजनांमध्ये चित्रे, वस्तू जोडणे, चिकटकाम, तक्ता पाहणे, खुणा ओळखणे, क्लेची कला, वस्तू बनवणे, प्रोजेक्टरवर फिल्म्स पाहणे, खेळणे आदी असल्याने त्यात भाषेचा (लेखन, वाचन) सहभाग कमी असतो. पुढे स्पर्धा, शिक्षण, करीअर, पैसा, यश या ऐहिक अग्रक्रमांच्या धांदलीमध्ये निवांतपणे वाचन करणे दुर्दैवाने दुरापास्तच झाले आहे.

पुस्तके म्हणजे केवळ पाठय़पुस्तके असा अनेक पालकांचा समज असतो. मुलांनी केवळ पाठय़पुस्तके वाचावीत, नव्हे त्यांची पारायणे करावीत अशी पालकांची अपेक्षा असते. अवांतर वाचन, बालकुमार साहित्य, बालकुमार मासिके आदी गोष्टी मुलांच्या भाषिक विकासासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असतात. पुस्तके विकत घेऊन वा ग्रंथालयातून आणून वाचणे हे संस्कार पालकांनी करायचे असतात, पण पालक यात कमी पडतात. मुळात भाषाप्रेम, वाचनानंद, लेखनातून अभिव्यक्ती, त्यातून संवाद कौशल्य या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात हे पालकांना आधी उमजायला हवे. मगच ते मुलांमध्ये बिंबवू शकतील. मुलांच्या वयानुसार, आवडीनुसार आणि आकलनानुसार पुस्तक निवडायला हवे. गंभीर, अवघड-वैचारिक पुस्तकांऐवजी मुलांना चित्रमय, मजेदार गोष्टींची पुस्तके, कॉमिक्स आवडतात. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेने कुमार-वाचकांसाठी काही गाजलेल्या पुस्तकांचे संक्षिप्तीकरण व सुलभीकरण करून त्याच्या खास आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. असे वा अन्य प्रकल्प मुलांमधील वाचन वाढवण्यास उपयुक्त ठरतात. मुलांना रॅट रेसमध्ये पळवणाऱया पालकांनी आणि संपूर्ण व्यवस्थेनेही भाषा संवर्धनासाठी चौकटीबाहेरचा विचारही करायला हवा.

काही जागरुक व संवेदनशील शिक्षक-पालकांना वाचन संस्काराचे काही प्रयोग करता येतील. ते असे-

1) एखादे पुस्तक घरातील मोठय़ा व्यक्तींनी ‘अभिवाचनासारखे’ वा नाटय़मय पद्धतीने वाचून दाखवणे.

2) एखाद्या पुस्तकाचे मुलांकडून सामुदायिक व क्रमशः वाचन करवून घेणे. मग ‘वाचनवीर’ म्हणून पुस्तक भेट देणे.

3) घरातल्या व्यक्तींनी रेडिओवरल्या श्रुतिकेसारखे एकेक परिच्छेद वाचणे. त्यात मुलांनाही सहभागी करणे.

4) घरातच एखादे हस्तलिखित तयार करणे. विषय देऊन वृत्तपत्रांची कात्रणवही करणे.

5) मुलांसह पालकांनी कॉम्प्युटरवर ई-अंक तयार करणे.

6) गोष्टीत पुढे काय घडू शकेल यावर अंदाज बांधणे. मुलांना कथापूर्ती करायला सांगणे.

7) एखाद्या कथेचे बीज घेऊन पथनाटय़ करणे.

8) एखादा शब्द (मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत वा अन्य भाषिक) शब्दकोशातून शोधण्याची स्पर्धा घेऊन बक्षीस म्हणून पुस्तक भेट देणे.

9) समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे शब्दांचा रियाज करण्याचा उपक्रमही घेता येतो. याच पद्धतीने शब्दांचा ‘ट्रेझर’ खेळ घेता येतो.

10) अमुक अक्षर आले की, त्या अक्षराच्या लेखकाची गोष्ट वाचायची… किंवा चिठ्ठीत आलेल्या शब्दावरून पुस्तक शोधायचे व वाचायचे… असे अनेक आकर्षक पर्याय मुलांसमोर ठेवता येतात.

या साऱया प्रयोगांसाठी घरचे भाषाप्रेमी व खिलाडू वृत्तीचे हवे. अशी घरेच भाषेचे पाथेय पुढच्या पिढय़ांकडे आनंदाने संक्रमित करू शकतात. अशा पुस्तकप्रेमी घरांचे स्वागत व्हायला हवे.

[email protected]