परदेशी मावळ्याचा कराडमध्ये सत्कार

457

सह्याद्री पर्वतामध्ये असणारे गड-किल्ले व शिवरायांच्या इतिहासाचे आकर्षण असलेला 47 वर्षांचा अवलिया ‘पीटर व्हॅन गेट’ हे सातासमुद्रापार असलेल्या बेल्जियम येथील नागरिक. अवघ्या 60 दिवसात 200 गडकिल्ले सर केले. या दिवसातील अनुभव कराडकरांना सांगत होते. निमित्त होतं ते कराड इथल्या त्यांच्या दुर्गभ्रमंतीचं आणि त्यानंतरच्या त्यांच्या सत्काराचं.

उमेश शिंदे युथ फाऊंडेशनच्या वतीने कराडमध्ये परदेशी पाहुण्यांच्या एक बहारदार व सुंदर कार्यक्रम झाला. वेणूताई चव्हाण स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमाचे इंग्रजीतील भाषणाचे मराठी भाषांतर मोरे (जनकल्याण शाळा) यांनी केले. कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, के .एन .देसाई, राजेंद्रसिंह यादव, उमेश शिंदे, सौरभ पाटील, भूषण जगताप यांनी समयोचित भाषण केले. प्रमुख पाहुणे म्हणून शेखर चरेगांवकर, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे,किरण पाटील, विजय वाटेगांवकर, सौरभ पाटील, शिवप्रतिष्ठानचे सागर आमले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पीटर व्हॅन गेट यांचा सत्कार करण्यात आलं.

युवा पिढीला प्रेरणा देणारे पीटर व्हॅन गेट हे महाराष्ट्रातील गडकिल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासाबद्दल बोलतात. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे सचित्र दर्शनाचा कराडकरांना अनुभव सांगत होते. हिंदुस्थानचा इतिहास, सह्याद्री पर्वतरांगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता हे पीटर व्हॅन गेट यांचे ध्येय. या ध्येयापोटीच ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गडभ्रमंतीसाठी भटकंती करताहेत. पीटर दोन महिन्यांपासून ते सह्याद्री पर्वतरांगांमध्ये फिरताहेत. अनेक लहान मोठे गडकिल्ले पाहून आल्यानंतर सध्या सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले पाहण्यासाठी कराड येथे आले असता सदाशिवगड, आगाशिवगड, वसंतगड पाहिले. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील गडकिल्ले पाहण्याची मोहीम सुरू केली आहे.

पीटर व्हॅन गेट यांचा गडकिल्ले चढण्याचा व उतरण्याचा वेग व क्षमता युवकांना लाजवील असा आहे. गडकिल्ल्यावर चित्त्याच्या वेगाने चढतात. कराड येथील सदाशिवगड सर करण्यास कराडमधील युवकांना 30 मिनिटे लागतात. पीटर व्हॅन गेट हे 10 ते 15 मिनिटात गडावर पोहोचले. सदाशिव गडावर सुमारे 1000 पायऱ्या आहेत. कराडपासून सदाशिवगड जवळ आहे. ‘वाटा सह्याद्रीच्या’ संस्थेचे अनिकेत साळोखे, सौरभ आदवडे, संकेत फडके, सर्वेश उमराणी, शुभम जंगम, प्रणव कुंभार, अथर्व गाडगीळ, माधव पित्रे, अमित पोतनीस, वैष्णवी सुर्वे, नितीन कुलकर्णी, आर्या फणसळकर, रोहित यादव, जयेश मोरे या कार्यकर्त्यांनी परदेशी पाहुणे पीटर व्हॅन गेट यांच्याबरोबर सदाशिव गड सर केला.

पीटर व्हॅन गेटनी कराडमधील नकट्या रावळ्याची विहिर पाहिली, कृष्णा -कोयना नदीच्या प्रितिसंगममध्ये येथेच्छ पोहले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतले, कराडकरांबरोबर फोटो काढले. कराडकरांच्या सन्मानाचा स्वीकार केला आणि त्यांनी मच्छिंद्रगडाकडे प्रस्थान केले.

आपली प्रतिक्रिया द्या