
कोरोना महामारीमुळे ढेपाळलेली देशाची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात पेट्रोलच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र डिझेलच्या विक्रीवर महामारीचे सावट दिसले. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डिझेल विक्रीत 7 टक्क्यांची घट झाली. यंदाच्या ऑगस्टच्या तुलनेत मात्र 22 टक्क्यांनी अधिक डिझेल विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून तळाला गेलेली पेट्रोल-डिझेल विक्री आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोलच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या आकडेवारीवरून इंधन विक्रीतील सकारात्मक वातावरण उजेडात आले आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलची मागणी वाढली, त्याचबरोबर या इंधनांच्या किंमतीत घसरण झाली. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 1 रुपया प्रतिलिटर, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये 9 पैशांची घट झाली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल मार्केटींग कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, यंदा सप्टेंबरमध्ये पेट्रोलच्या विक्रीत 22 लाख टनपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 21.6 लाख टन इतकी पेट्रोल विक्री झाली होती. तसेच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 52 लाख टन डिझेल विक्री झाली होती. यंदा त्यात घट झाली. यंदाच्या सप्टेंबरमध्ये 48.4 लाख टन इतकी डिझेल विक्री झाली.





















































