
पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून हे प्राथमिक आरोग्य केंद्र तीन दिवस सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला कर्मचारी पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाला होता. मात्र, त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. अहवाल येईपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोग्य केंद्रातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांना बाह्यरूग्ण आणि आपत्कालीन सेवा गावठाण येथील आंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे, असे डॉ. विधाटे यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.


































































