
पुण्यातील पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार हत्यारांनी गळ्यावर वार करून खून करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तरुणाचा चेहरा दगडाने ठेचला आहे.
मृत तरुणाची ओळख पटली असून सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत असे त्याचे नाव आहे. हा 30 वर्षीय तरुण मूळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडीत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप पंडीत हे मागील काही वर्षापासून पुण्यातील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहेत. तर सुदर्शन हा पुण्यातील पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) रसायन शास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी दीडवर्षापूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरात भाड्याने राहत होता.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना सुसखिंडीत मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी लवकरच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदर्शनच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या गळ्यावर वार करून व ओळख न पटण्यासाठी दगडाने ठेचला होता.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या पॅन्टच्या खिशात पाकीट आढळले. पाकीटात आधारकार्ड होते. या आधारकार्डाच्या आधारे पोलिसांना सुदर्शनच्या भावा विषयी माहिती मिळाली. भावाकडील चौकशीत सुदर्शन हा दीड वर्षापूर्वी पुण्यात पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आला असल्याचे समजले. परंतु, त्याच्या खुनामागील कारण समजु शकले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
































































