शारीरिक सुखापासून जबरदस्तीने दूर ठेवणं हे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन- उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या व्यक्तिला शारीरिक सुखापासून जबरदस्तीने दूर ठेवणं किंवा त्यासाठी जबाबदार असणं हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. मद्रास उच्च न्यायालयात एका अपघातामुळे अपंग झालेल्या व्यक्तिची याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने असं म्हटलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एन. आनंद कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. 2008मध्ये आनंद यांच्यावर विजेचा खांब कोसळला होता. त्यामुळे त्यांच्या पाठीचा कणा दुखापतग्रस्त होऊन त्यांचे कंबरेखालील अवयव लुळे पडले होते. यापूर्वी दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश चेन्नई नगर निगमला दिले होते. मात्र, याप्रकरणी चेन्नई नगर निगमने विभागीय खंडपीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या व्यक्तिला जबरदस्तीने शारीरिक सुखापासून वंचित ठेवणं हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. या अपघातामुळे आनंद यांचं आयुष्य व्हीलचेअरवर येऊन तर थांबलंच पण शारीरिक अपंगत्वामुळे त्यांच्या विवाहाच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे शारीरिक सुखाचा मूलभूत मानवाधिकार त्यांच्यापासून हिरावला गेला. शारीरिक सुख न मिळाल्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनाही त्यांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा अपघात चेन्नई नगर निगमच्या निष्काळजीपणामुळे झाला होता आणि आनंद यांना त्याची भरपाई मिळायलाच हवी, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. सोबत न्यायालयाने ठोठावलेली पाच लाखांची नुकसान भरपाई 12 पटींनी वाढवत चेन्नई नगर निगमला 63 लाख रुपये देण्याचे आदेश दिले.