
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा सेवाकाल राज्य सरकारने वाढवला असून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु ही मुदतवाढ राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने दिली असल्याचा आरोप करत ऍड. आर. आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पोलीस दलात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले होते. तेव्हा त्यांना शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. नोव्हेंबरअखेरीस ही मुदतवाढ संपल्याने शासनाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ दिली असून ते फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु राज्य सरकारने पक्षपातीपणा करत पडसलगीकर यांना मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ रद्द करण्यात यावी तसेच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेणाऱ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.



























































