घाटकोपर आणि अंधेरी स्थानकांतील चेंगराचेंगरी रोखा, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे आदेश

748

‘मुंबई मेट्रो वन’मुळे घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रवाशांच्या कोंडीची दखल रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घेतली असून या चेंगराचेंगरीवर तातडीने उपाय योजा आणि महिनाभरात अहवाल सादर करा असे आदेश शुक्रवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांना दिले. मध्य रेल्वेच्या राजधानीच्या सेवेतील वाढ आणि विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शुक्रवारी गोयल यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा रेल्वे सेवेशी घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकात जोडली जात असल्याने येथे गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे येथे गर्दीच्या वेळेत कोंडी तयार होते. यासंदर्भात भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केलेल्या सूचनेचा उल्लेख करीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांना आजच्या आजच दोन्ही स्थानकांना भेट देऊन त्यांची पाहणी करण्याचे यावेळी आदेश दिले. तसेच या स्थानकांवर कोणत्या प्रवासी सुविधा वाढविता येतील त्याची माहितीही महिनाभरात सादर करा, असेही गोयल यावेळी म्हणाले.

उपनगरीय रेल्वेत चारपट गुंतवणूक
नव्या सरकारला 102 दिवस पूर्ण झाले असले तरी मुंबई उपनगरात उद्घाटनाच्या प्रकल्पांची संख्याही 102 झाली आहे. 2009 ते 2014 या वर्षांत केंद्राने उपनगरीय रेल्वेसाठी 5,900 कोटींची गुंतवणूक केली होती. आता त्यात चार पटीनी वाढ होऊन 2014 ते 2020 या वर्षांत तब्बल 24 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे गोयल म्हणाले.

राजधानीच्या आठवड्यातून पाच फेऱ्या
मध्य रेल्वेवरून नाशिकमार्गे धावणाऱ्या राजधानीच्या आता आठवडय़ातून चार फेऱया करण्याच्या सेवेचे लोकार्पण रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. मध्य रेल्वेच्या राजधानीला चांगला प्रतिसाद मिळत असून तिच्या आता आठवडय़ातून पाच फेऱया करण्याच्याही योजनेचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

संपूर्ण विजेवर धावणारी पहिली रेल्वे
यावेळी ग्रीन स्टेशन म्हणून चेंबूर आणि डॉकयार्ड या स्थानकांच्या छतावर बसविलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते झाले त्याचा उल्लेख करून रेल्वेमंत्र्यांनी अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्याची मागणी यावेळी केली. सध्या रेल्वेचे 45 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून येत्या तीन ते चार वर्षांत संपूर्ण रेल्वे विजेवर धावणार असल्याने इतका मोठा मार्ग विजेवर चालविणारी ही जगातील पहिली रेल्वे ठरणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले. रेल्वेच्या जागांवर सोलार पॅनल उभारून जेवढा विजेचा वापर असेल त्यापेक्षा जास्त वीज निर्माण करण्याचा प्रयत्न असायला हवा, असेही ते म्हणाले.

आईनस्टाईनच्या चुकीच्या उल्लेखाबद्दल माफी
रेल्वेमंत्र्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनऐवजी आईनस्टाईनने लावल्याचे एका व्यापारी परिषदेत वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना ट्विटरवर काल ट्रोल करण्यात आले होते. त्याबद्दल त्यांनी अनवधानाने आपल्याकडून चूक झाल्याची कबुली देत आईनस्टाईनचेच ‘जो माणूस चुका करीत नाही तो कधी नवनिर्मिती करू शकत नाही’ हे वाक्य सांगत टीकाकारांना गप्प केले.

आपली प्रतिक्रिया द्या