‘या’ सहा देशात अनेक महिने होत नाही सूर्यास्त…मध्यरात्रीही तळपतो सूर्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्योदय आणि सूर्यास्त या क्रिया निसर्गचक्रानुसार अव्याहतपणे सुरू असतात. मात्र, पृथ्वीवर असेही काही देश आहेत, ज्या देशात सूर्योदय बघण्यासाठी अनेक महिन्यांची प्रतिक्षा करावी लागते. तिथे तापमान उणे 15 अंशाच्या खाली असते. त्याचप्रमाणे काही देशात अनेक महिने सूर्यास्तच होत नाही. या देशात मध्यरात्रीही सूर्य तळपत असतो. त्यामुळे अशी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

सूर्यास्तच झाला नाही तर दिवस किती मोठा असेल, पूर्ण दिवस सूर्यप्रकाशामुळे अनेक कामे करता येतात, असे वाटते. मात्र, अशा प्रतिकूल वातावरणामुळे तेथील नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक महिने अंधार असलेल्या देशांमध्ये नागरिकांमध्ये विटामीन डीची कमतरता आढळते. त्यामुळे त्यांना नैराश्य येते. तर अनेक महिने सूर्यास्त होत नसलेल्या देशात अनेकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते. अशा समस्या असल्या तरी जगातील अशी ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

नॉर्वे हा देश ध्रुवीय प्रदेशाजवळ आहे. त्यामुळे या देशाला ‘लँड ऑफ मिडनाईट सन’ असेही म्हणातात. म्हणजेच या देशात मध्यरात्रीही सूर्य तळपत असतो. या देशात मे ते जुलै या काळातील 76 दिवस सूर्यास्तच होत नाही. एवढे दिवस तेथे 24 तास सूर्य तळपत असतो. नॉर्वेतील स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सूर्यास्तच झाला नाही, तर कसे वाटेल याचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण या देशात जातात.

कॅनडातील नुनावत हे लहान शहर आहे. या देशात दोन महिने सूर्य क्षितिजावर कायम असतो. दोन महिने या ठिकाणी सूर्यास्तच होत नाही. तर थंडीच्या दिवसात 30 दिवस पूर्ण रात्र असते. त्या दिवसात सूर्योदय होत नाही. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त न होणाऱ्या या देशात अनेक पर्यटक येतात.

आइसलँड हे ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे बेट आहे. या ठिकाणी जून महिन्यात सूर्यास्त होत नाही. या देशात मध्यरात्रीही तळपत्या सूर्यप्रकाशाचा आनंद लुटता येतो. त्यामुळे हे बेटही पर्यटकांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे अलास्कामधील बैरोमध्ये मे महिन्याच्या अखेरीपासून जुलै महिना संपेपर्यंत सूर्यास्त होत नाही. तसेच नोव्हेंबरपासून महिनाभर येथे रात्र असते. त्यामुळे येथील रात्रीला ‘पोलर नाईट’ असेही म्हणतात. ही जागा बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि ग्लेशियरसाठी प्रसिद्ध आहे.

फिनलँड हा देश अनेक सरोवर आणि बर्फाच्या बेटांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात या देशात 73 दिवस सूर्य मावळत नाही. त्यामुळे बर्फावरील साहसी खेळ, स्कीइंगचा आनंद घेण्यासोबत ग्लास इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात. स्वीडन या देशात मे ते ऑगस्टदरम्यान मध्यरात्री सूर्यास्त होतो आणि पहाटे 4.30 वाजता सूर्योदय होतो. सतत सहा महिने या देशात सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे या देशात गोल्फिंग, मासेमारी, ट्रेकिंग ट्रेल्स आणि अनेक साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात.